साडीत गुंडाळून मृतदेह फेकले विहिरीत; माफीच्या साक्षीदाराची धक्कादायक कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:11 IST2024-12-11T17:09:50+5:302024-12-11T17:11:42+5:30
स्मशानभूमीच्या विहिरीजवळ गेल्यानंतर वकीलाचा मृतदेह साडीत गुंडाळला आणि नंतर त्यांच्या पत्नीचा मृतदेह साडीत गुंडाळून गोणीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने दिली.

साडीत गुंडाळून मृतदेह फेकले विहिरीत; माफीच्या साक्षीदाराची धक्कादायक कबुली
Ahilyanagar Murder ( Marathi News ) : राहुरी येथील वकील दाम्पत्याचा डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घृण खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेला हर्षल ढोकणे याने मंगळवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर दिली आहे. दरम्यान, माफीच्या साक्षीदाराला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. आज बुधवारी पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.
बहुचर्चित राहुरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली, यातील हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याने मंगळवारी झालेल्या सर तपासणीत खुनाचा घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला.
राहुरी येथील न्यायालयातून अपहरण करून वकील दाम्पत्याला २५ जानेवारी रोजी त्यांच्याच मानोरी येथील बंगल्यावर नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर मुख्य आरोपी किरण दुशिंग याने वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, मी कर्जबाजारी आहे. मॅडमच्या खात्यावर ६० ते ६५ हजार रुपये आहेत. ते देऊ शकतो, असे सांगितले. त्यावेळी दुपारचे तीन वाजलेले होते. किरणने तुमच्या मुलाचे मॅटर मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी मागणी वकिलांकडे केली. मात्र, वकिलांनी त्यांना पैसे दिले नाहीत. वकील दाम्पत्य पैसे देत नसल्याने आरोपींनी त्यांच्याकडे चारचाकी वाहनाची चावी मागितली. मॅडमने कारची चावी दिली. एकाने कार बंगल्याच्या पाठीमागील दरवाजासमोर आणून उभी केली. त्यात वकील दाम्पत्याला बसवले. कार ब्राम्हणीगाव शिवारातील वनक्षेत्रातील चारीच्या रस्त्याने निघाली. किरण दुशिंग हा कार चालवत होता. त्याने कार ब्राम्हणी येथील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत उभी केली. तिथे वकील दाम्पत्याच्या तोंडावरची पट्टी किरणने काढली व तुमच्या मुलाचे कोणतेही मॅटर नाही. तुम्ही आम्हाला किती पैसे देणार ते सांगा, अशी विचारणा केली. त्यावर वकिलांनी पैसे नसल्याचे सांगितले.
मॅडमच्या बँक खात्यातील काही पैसे आरोपी किरणने दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर केले. त्यानंतर कार ब्राम्हणी येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत निर्जनस्थळी नेली. तिथे किरणने पुन्हा पैशांची मागणी केली असता वकील साहेबांनी पैसे नसल्याचे सांगितले. वकील साहेब व मॅडम किरणला सोडून देण्याची विनंती करत होते. पण, पैसे द्या, मग सोडतो, असे किरण त्यांना म्हणत होता. रात्री बराच वेळ झाला होता. किरणने वकील साहेब व व मॅडमच्या डोक्यात प्लास्टिक पिशवी घालण्यास सांगून वरून चिकट टेप लावण्यात आला. पुढे गेल्यानंतर एकाच्या घरून साड्या घेतल्या, आणखी पुढे गेल्यानंतर एका हॉटेलमधून गोण्या घेऊन त्यात दगड भरले. कार उंबरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन वकील साहेबांचा मृतदेह साडीत गुंडाळला. नंतर मॅडमचा मृतदेह साडीत गुंडाळून गोणीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार ढोकणे याने दिली.
दरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी, तर आरोपींच्या वतीने अॅड. सतीश वाणी यांनी काम पाहिले.