पथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:34 IST2018-02-08T18:31:23+5:302018-02-08T18:34:44+5:30
अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या
अहमदनगर : अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनपा आयुक्तांनी १८ फेब्रुवारीपर्यंत पथदिवे चालू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, जॉय लोखंडे, मंगेश खताळ, लकी खुबचंदाणी, सॅम्युल खरात, भगवान आव्हाड, महेश कापरे, अमित औसरकर, अक्षय ससाणे, मळू गाडळकर, रोहित रासकर, संतोष ढाकणे, प्रशांत डहाळे, ओंकार ससाणे, महेश जाधव, किशोर पाटोळे आदी सहभागी झाले होते.
कोठी ते यश पॅलेस या मार्गावर आनंदऋषीजी महाराज यांचे समाधी स्थळ, आनंदऋषीजी हॉस्पिटल, भाजी मार्केट, धान्य मार्केट, शाळा तसेच मोठी नागरी वस्ती आहे. या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. आनंदऋषीजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या या भागात राज्यासह देशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियमीत होत असल्याने या मार्गावर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची नेहमी वर्दळ असते़ या मार्गावर अनेकवेळा अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक नागरिकांचे मोबाईल, पैसे हिसकावणे तसेच जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर महापालिकेने पथदिवे लावले़ मात्र, ते अद्याप सुरुच झालेले नाहीत. तरीही पथदिवे बसविणाºया ठेकेदारास महापालिकेने बील अदा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे़ तातडीने या रस्त्यावरील पथदिवे चालू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.