नेवाशात वाळू तस्करांची तलाठी, कोतवालाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:48+5:302021-08-12T04:25:48+5:30
नेवासा : वाळू वाहतूक करणारा टेम्पो का पकडला म्हणत वाळू तस्करांनी कामगार तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की व शिवीगाळ ...

नेवाशात वाळू तस्करांची तलाठी, कोतवालाला मारहाण
नेवासा : वाळू वाहतूक करणारा टेम्पो का पकडला म्हणत वाळू तस्करांनी कामगार तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत वाळू वाहतूक करणारा टेम्पो पळविला. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुपटी येथील कामगार तलाठी गणेश घुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिल्याने घुमरे व कोतवाल बाळासाहेब चौधरी हे १० ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चिंचबन-नेवासा रस्त्यावर दुचाकीवरून फिरत होते. ते गणेश शिंदे यांच्या वस्तीजवळ आले असता नेवाशाकडून विटकरी रंगाचा टेम्पो येताना दिसला. त्यास थांबविले असता त्या टेम्पोमध्ये दोन ब्रास वाळू असल्याचे दिसून आल्याने टेम्पोवरील चालकास घुमरे यांनी ओळख सांगून त्यास त्याचे नाव व वाळू वाहतूक परवान्याबाबत विचारले. तर त्याने नाव न सांगता टेम्पोच्या पाठीमागे जाऊन कोणाला तरी फोन लावून तेथून पळून गेला. या टेम्पोवरील नंबर प्लेट नव्हती. त्यानंतर घुमरे व कोतवाल चौधरी हे तेथेच थांबले असता थोड्या अंतरावर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आली. या कारमधून दत्तात्रय आसाराम हिवरे (रा. नेवासा खुर्द) व त्याच्यासोबत दोन अनोळखी व्यकती उतरले. घुमरे व चौधरी यांना आमचा टेम्पो कसा पकडला, असे म्हणू धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच तुमचे आम्ही हातपाय मोडून टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी पळून गेलेला टेम्पो चालक तेथे आला व त्याने अंदाजे २ ब्रास वाळू असलेला टेम्पो सुरू करून चिंचबन रोडने नेला. त्यानंतर तलाठी घुमरे व कोतवाल चौधरी यांनी घडलेला प्रकार तहसीलदार यांना सांगितला.
घुमरे यांच्या फिर्यादीवरुन दत्तात्रय आसाराम हिवरे व त्याचे दोन साथीदार तसेच टेम्पो चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहेत.