वय वर्ष ६०; एकटेपणा वाटल्यानं आजोबांनी बांधली लगीनगाठ; नगरमधील विवाहाची राज्यभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 15:31 IST2021-08-04T15:31:20+5:302021-08-04T15:31:34+5:30
शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या ६०व्या वर्षी ४० वर्षीय महिलेशी लगीनगाठ बांधली आहे.

वय वर्ष ६०; एकटेपणा वाटल्यानं आजोबांनी बांधली लगीनगाठ; नगरमधील विवाहाची राज्यभर चर्चा
अहमदनगर: आतापर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. पण अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील ६० वर्षीय आजोबा दुसऱ्यांदा लग्न बेडीत अडकल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या ६०व्या वर्षी ४० वर्षीय महिलेशी लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या परिसरात ६० वर्षीय आजोबांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
६० वर्षीय तबाजी चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर मुलीचेही लग्न झाले. त्यामुळे घरात ते एकटेच राहिले. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होतं होते. त्यात शेती व जनावरेही संभाळण्याची त्यांची ताकद कमी होत चालली होती. त्यांच्या एकटेपणावर उपाय म्हणून मुलगी सरिता बाचकर व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला.
सुरूवातीला समाज काय म्हणेल. हे काय लग्नाचे वय आहे आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे त्यांनी नकारच दिला. मात्र मित्रपरिवार आणि मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि राहुरी तालुक्यातील शिंगवे गावातील ४० वर्षीय सुमनबाईंसोबत केवळ आठ ते दहा वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत विधिवत लग्न केले.
सुमनबाई यांनीही आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न करत असल्याचे सांगितले. मी या लग्नापासून आनंदित आहे, असंही सुमनबाई म्हणाल्या. आयुष्याच्या अशा टप्प्यावर पुन्हा या दोघांना जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदाने जीवनाची दुसरी इनिंग सुरू केली आहे.