शेतकऱ्यांचा ठिय्या, घेराव
By Admin | Updated: July 17, 2014 00:31 IST2014-07-16T23:23:47+5:302014-07-17T00:31:17+5:30
शेवगाव : हरभरा पीकविम्याची रक्कम तातडीने मिळावी, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील चेडे चांदगाव, ठाकूर निमगाव, थाटे, मंगरुळ, हसनापूर, मुर्शतपूर आदी गावातील शेतकऱ्यांनी
शेतकऱ्यांचा ठिय्या, घेराव
शेवगाव : हरभरा पीकविम्याची रक्कम तातडीने मिळावी, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील चेडे चांदगाव, ठाकूर निमगाव, थाटे, मंगरुळ, हसनापूर, मुर्शतपूर आदी गावातील शेतकऱ्यांनी बुधवारी तालुका विकास अधिकाऱ्याला घेराव घालून कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
भाजपा नेते अॅड. शिवाजीराव काकडे, शेतकरी संघटनेचे नेते ताराचंद लोंढे, विनायक खेडकर, अशोक ढाकणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सन २०१२-१३ मध्ये तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा पीक विमा भरला होता. ज्वारीचा पीक विमा मंजूर झाला मात्र ज्वारी, हरभरा पीक विमा मंजूर झाला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव व ठिय्या आंदोलनाचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.
अधिकाऱ्यांना सुनावले
ज्वारी व हरभरा ही पिके एकाच हंगामात घेण्यात आली. रब्बी हंगामात ज्वारीसाठी पाऊस पडला नाही तर हरभरा पिकासाठी कसा पडला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हरभरा पिकाचे रेकॉर्ड चुकीचे भरल्याचा आरोप काकडे यांनी करुन कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
हरभरा पिकाचे गेल्या तीन वर्षातील रेकॉर्ड पुन्हा व्यवस्थित करुन विमा कंपनीला पाठवावे, शेतकऱ्यांना हरभरा पीक विमा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी काकडे यांनी केली. याच प्रश्नी नायब तहसीलदार रावसाहेब घाडगे यांचीही काकडे व शेतकऱ्यांनी भेट घेतली.
(तालुका प्रतिनिधी)
अधिकारी निरुत्तर
एकाच गटनंबर व शेतातील दोन एकर ज्वारीला पीक विमा मंजूर झाला. तर त्याशेजारील दोन एकर हरभरा पिकाला तो नामंजूर झाला. मग ज्वारीला पाऊस झाला नाही. मग हरभऱ्याला कुठून पाऊस आला, असा सवाल विनायक खेडकर या शेतकऱ्याने उपस्थित केल्यानंतर कृषी अधिकारी निरुत्तर झाले.