अहमदनगर : तौउते चक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत असून त्याचा परिणाम वीज पुरवठा खंडित होण्यावर झाला आहे. रविवार आणि सोमवारी असे दोन दिवस नगर शहरासह अनेक भागांचा वीज पुरवठा कमी अधिक प्रमाणात खंडित झाला.
रविवारपासून तौउते चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवर बसत आहे. त्याचा परिणाम नगर जिल्ह्यातही जाणवत असून रविवार, सोमवार असे दोन दिवस जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहत आहे. सोमवारी सकाळी तसेच सायंकाळी कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
या वादळामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडेही पडले आहेत. ज्या ठिकाणाहून वीज वाहक तारा जात आहे तेथील झाडे पडल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला.
रविवारी नगर शहरातील सावेडी, बालिकाश्रम रोड, तसेच इतर अनेक भागातील वीज पुरवठा तासनतास बंद होता. नगरसह इतर भागातही वादळामुळे अनेक ठिकाणच्या तारा तुटल्या तसेच विजेचे खांबही वाकले. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा सोमवारी दिवसभर खंडित करण्यात आला होता. वादळी वाऱ्यामुळे दुरुस्तीमध्ये अडचणी येत होत्या. तरीही महावितरणचे कर्मचारी काम करत होते. ज्या भागातील वीजपुरवठा सुरू आहे तेथेही अनेक तारा झाडांमध्ये एकमेकांवर घासत असल्याने स्पार्किंग होत होते. त्यामुळेही त्या भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते.
दरम्यान, या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे पत्रे उडाले, तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या कांदा काढणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतात काढून पडला असून तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.