‘तनपुरे’च्या कामगारांचा कुटुंबासह रास्ता रोको
By Admin | Updated: September 19, 2014 23:39 IST2014-09-19T23:34:26+5:302014-09-19T23:39:55+5:30
राहुरी : येथील तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी कुटुंबासह रास्तारोको आंदोलन करून आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली़

‘तनपुरे’च्या कामगारांचा कुटुंबासह रास्ता रोको
राहुरी : ४१ महिन्यांचा पगार थकल्याने सहनशीलतेचा अंत झालेल्या राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी कुटुंबासह जम्बो रास्तारोको आंदोलन करून आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली़ राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नगर-मनमाड राज्यमार्गावर झालेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जाईल व कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही साखर सहाय्यक आयुक्त कार्यालयातील लेबर आॅफिसर तळेकर यांनी दिल्यानंतर रास्तारोको आंदोलनावर पडदा पडला़
कारखान्याच्या गेटसमोर जमलेले कामगार कुटुंबातील सदस्यासह रस्त्यावर घोषणा देत आले़ आमचे पगार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली़ कामगारांच्यावतीने तहसीलदार राजश्री आहिरराव यांना संगीता गोल्हार, सविता कराळे, सुनीता राऊत, दुधाळे यांनी निवेदन दिले़ कामगारांच्या मागण्या न्याय असून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही तहसीलदार अहिरराव यांनी दिली़ कारखान्याच्या जंगम मालमत्तेची विक्री करून कामगारांचे पगार केले जातील़ जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल़, असे त्यांनी सांगितले.
सुरेश थोरात म्हणाले, कारखान्याची सर्वसाधारण सभा होत असून संचालक मंडळाने कामगार हिताचा विचार करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल़ अर्जुन दुशिंग यांनी कारखाना सुरळीत चालावा म्हणून कामगारांनी आटोकाट प्रयत्न केला आहे़ कामगारांचे पगार द्या अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला़
यावेळी अशोक नगरे,भारत पेरणे,भाऊसाहेब पगारे, संजीव भोर,चंद्रकांत कराळे, सविता कराळे, सोमनाथ वाकडे, प्रभाकर तारडे, निखील कराळे, दत्तात्रय कोहकडे यांची भाषणे झाली़
(तालुका प्रतिनिधी)