राहुरीत नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:46 IST2019-02-21T19:46:45+5:302019-02-21T19:46:56+5:30
राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित नवीन इमारतीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर जिजाऊ चौकात

राहुरीत नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको
राहुरी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित नवीन इमारतीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर जिजाऊ चौकात बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जोपर्यंत कुदळ टाकून भूमीपजून होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. ग्रामीण रुग्णालय होणार असेल तर शहरातील जुन्या जागेतच व्हायला हवे. कुणाचेही मनसुबे सफल होवू देणार नाही. या ज्वलंत प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करू, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिला.
आंदोलनप्रसंगी थोरात यांनी प्रशासनाच्या चालढकलीबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदविला. दोन दिवसात भूमीपूजन करुन तात्काळ बांधकामास सुरुवात करावी. नगर-मनमाड मार्गावर अपघात झाल्यानंतर तात्काळ सुविधा न मिळाल्याने अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. येथून पुढे आरोग्य असुविधेमुळे कोणाचा मृत्यू ओढवला तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पापा बिवाल, सचिन साळवे, निलेश जगधने, गुलशन बिवाल, तानसेन बिवाल, बाबासाहेब शेलार, राजेंद्र जगधने, कांतीलाल जगधने, संजय संसारे, तुषार दिवे, सीताराम दिवे, किशोर पंडीत, मयुर कदम, विकी पंडीत, किरण पंडीत, नेल्सन कदम, माउली भागवत, बाळू पडागळे आदींसह रिपाइं कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तहसीलदार अनिल दौंडे, आरोग्य प्रशासनाचे जिल्हा निवासी वैद्यकिय अधिकारी संजीव बेळंबे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता फुलचंद जाधव, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ हजर होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दीड तास सुरु राहिलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुर्तफा वाहतूक कोंडी झाली होती.
आरोग्य, बांधकाम विभागाची टोलवाटोलवी
आरोग्यसेवा मरनासन्न अवस्थेत आहे. येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. रुग्णालय इमारतीसाठी जागा उपलब्ध आहे. शासनाचा निधी मंजूर आहे. मात्र एका इसमाच्या अर्जावर बांधकाम बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रश्नावर बांधकाम विभाग, आरोग्य खाते टोलवाटोलवी करत आहेत, असा आरोप अरुण साळवे यांनी केला.