जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:30:55+5:302014-07-13T00:17:24+5:30
अहमदनगर : तेलंगशी (ता. जामखेड) या ठिकाणी दलित समाजाच्या खासगी मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राचे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन
अहमदनगर : तेलंगशी (ता. जामखेड) या ठिकाणी दलित समाजाच्या खासगी मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राचे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. हे काम थांबविण्याच्या मागणीसाठी शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर बांधकाम थांबविण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर यांनी दिली.
तेलंगशी या ठिकाणी दलित समाजाच्या जागेवर गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी दंडेलशाही पध्दतीने आरोग्य उपकेंद्राचे काम सुरू केले असल्याची तक्रार आहे. याच जागेवर पूर्वी संबंधित लोकांनी मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तहसीलदार यांच्याकडे झालेल्या तक्रारीनंतर सदरचे काम थांबविण्यात आले होते.
या प्रश्नी गावातील दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी आवाजही उठविला होता. तसेच तहसील कार्यालयात आंदोलनही केलेले होते. संबंधित जागा खासगी असतांनाही त्या ठिकाणी विनाकारण आकसबुध्दीने ग्रामपंचायत बांधकाम करत असल्याची तक्रार रवींद्र जावळे, दिलीप गायकवाड, संजय शितोळे, राजेंद्र शिरोळे, वैजीनाथ जावळे यांनी केली आहे.
.दलितांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी शिवराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भोर आणि सिध्दार्थ घायतडक यांनी केली आहे.