अंकुरलेल्या सोयाबीन पिकाला तुषार सिंचनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:53+5:302021-07-08T04:14:53+5:30

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ...

Sprinkler irrigation base for sprouted soybean crop | अंकुरलेल्या सोयाबीन पिकाला तुषार सिंचनाचा आधार

अंकुरलेल्या सोयाबीन पिकाला तुषार सिंचनाचा आधार

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीवर निघालेली ही पिके आता संकटात सापडली आहेत. अनेक भागांत तुषार सिंचनाचा आधार घेत पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात यावर्षी साडेसोळा हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप पेरणीचा कालावधी जवळपास संपायला आला, तरी तालुक्यात अवघ्या साडेचार ते पाच हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पाऊस कमी प्रमाणात असलेल्या भागात तर अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, ते शेतकरी पावसाने दडी मारल्याने आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करत आहेत.

.................

एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे विकतचे पाणी...

राहाता तालुक्यात सोमवारी (दि. ५) सायंकाळी आडगाव या गावच्या परिसरात अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. तर, या गावच्या लगतच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकेवाके शिवारात सध्या विकत पाणी घेऊन शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

....................

पावसाच्या आगमनाची डोळे लावून वाट पाहत आहोत. पण, पावसाचे दर्शन काही होईना. जर येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल, या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली आहे.

- रामप्रसाद मगर, शेतकरी, गोगलगाव

....................

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सुरुवातीलाच कमी झाला. त्यामुळे थोडीशी ओल आली. या ओलीचा आधार घेत महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने पीक उगवेल की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेल्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पुन्हा खर्च करून हातात काहीच पडले नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

-राजू धनवटे, शेतकरी, वाकडी

Web Title: Sprinkler irrigation base for sprouted soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.