खेड्यांना हव्या प्रशस्त शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:52+5:302021-06-24T04:15:52+5:30
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. परंतु या शाळांच्या अनेक खोल्या जुन्या झाल्याने नवीन शाळा खोल्यांची ...

खेड्यांना हव्या प्रशस्त शाळा
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. परंतु या शाळांच्या अनेक खोल्या जुन्या झाल्याने नवीन शाळा खोल्यांची गरज आहे. सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेला ९३० शाळा खोल्यांची गरज असून, येत्या शैक्षणिक वर्षात ३१६ नवीन खोल्यांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी २८ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. एका खोलीला ८ लाख ७५ हजार रुपये खर्चाची तरतूद आहे. एवढ्या खर्चामध्ये १६ गुणिले २० अशी केवळ ३२० चौरस फुटांची व १० फूट उंचीची स्लॅबची खोली तयार होते.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची स्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे झाले आहे. येत्या काही दिवसांत शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना अंतराने बसावे लागेल. या दृष्टीने सध्या मोठ्या शाळा खोल्यांची गरज भासते आहे. पूर्वीच्या शाळा प्रशस्त व हवेशीर होत्या. त्यामुळे विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत होते. आताच्या ज्या नवीन खोल्या होत आहेत, त्यात क्षेत्रफळही कमी आहे, शिवाय खोलीची उंची केवळ दहा फूट असल्याने विद्यार्थ्यांना कोंदट वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने आणखी काही खर्चाची तरतूद करून किंवा आहे त्या रकमेत काटकसर करून प्रशस्त खोल्या बांधण्याची मागणी होत आहे. कोरोना काळात ही गरज आणखी प्रकर्षाने पुढे आली आहे.
------------
हिवरे बाजार गावाने चार वर्षांपूर्वीच हा प्रयोग केला आहे. सरपंच पोपटराव पवार यांनी दूरदृष्टी ठेवून त्यांच्या गावात झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या प्रशस्त बांधून घेतल्या आहेत. यासाठी त्यांनी काही प्रमाणात लोकसहभागही घेतला. हिवरे बाजारमध्ये २०१६-१७ मध्ये एकूण सात खोल्या जिल्हा परिषदेने मंजूर करून ३४ लाखांची तरतूद केली. परंतु पवार यांनी लोकसहभागातून आणखी १४ लाख रुपये रकमेची तरतूद करून या शाळा खोल्या मंजूर आकारापेक्षा मोठ्या आकारात बांधून घेतल्या. त्यासाठी खासगी वास्तुविशारदाची मदत घेतली. त्यामुळे एक वर्ग खोली २४ गुणिले ३० अशी तब्बल ७२० चौरस फुटांची झाली. शिवाय यासाठी स्लॅबची उंची त्यांनी दहाऐवजी १२ फूट करून घेतली. म्हणजे या खोल्या प्रशस्त आणि मुलांच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंग राहील अशा झाल्या. कोरोनाच्या काळानंतर आता हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू झाली तेव्हा सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना आली नाही. जिल्हा परिषदेनेही हिवरे बाजारचा आदर्श घेत तशा खोल्या केल्या तर आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----------------
फोटो - २३ हिवरे बाजार शाळा
हिवरे बाजार येथील जिल्हा परिषदेची प्रशस्त शाळा.