कोपरगाव तालुक्यात २९.४ टक्के पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:52+5:302021-07-08T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ या खरीप हंगामाची आतापर्यंत २९.४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. मात्र, ...

कोपरगाव तालुक्यात २९.४ टक्के पेरण्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ या खरीप हंगामाची आतापर्यंत २९.४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. मात्र, मागील आठवड्यापासून तालुक्यात पावसाने दडी मारली असून उष्णतेतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पेरणी केलेली पिके संकटात सापडली आहे. तसेच ७ जुलैअखेर तालुक्यात १४०.६ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे.
यंदाच्या खरिपात आतापर्यंत (सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये) बाजरी ११३, कपाशी ६११, सोयाबीन ४,१३१, मका २,५४६ या पिकांसह उडीद ४०, तूर २, मूग ९८, भुईमूग १५, चारापिके ७२३, भाजीपाला २३०.९०, मसाला पिके २०.२० पिकांची पेरणी करण्यात आली.
तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी होते. त्यातच काही गावांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केलेली पिके अत्यंत चांगल्या पद्धतीने उतरून पडली होती. मात्र, आठवडाभरापासून पावसाने दडी मारली असून उन्हाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेमुळे पिके कोमेजून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी व तुषार सिंचन उपलब्ध आहे, त्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध नाही, अशा शेतक-यांना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करून पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक औषधांसह खतांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटातही आर्थिक जुळवाजुळव करून खरीप हंगामात पिके उभी केली आहे. मात्र, पावसाने दडी मारली आहे. या आठवड्यात पाऊस झालाच नाही, तर शेतकऱ्यांची सर्व पिके कामातून जातील. त्यामुळे शेतकरी पूर्णतः चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीमध्ये कमी प्रमाणात पेरणी झाली आहे.
...............
गेल्या वर्षीच्या तुलनेत सद्यःस्थितीत पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच १०० मिलिमीटर पेरणीयोग्य ओल पाऊस झाल्याशिवाय पेरणी करायची नाही, अशा सूचना आहे. मूग आणि उडीत ही पिके वगळता खरिपातील इतर सर्व पिकांची १५ जुलैपर्यंत पेरणी करता येते. तसेच सध्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांकडे पाणी तसेच तुषार सिंचन उपलब्ध असल्यास त्यांनी त्याद्वारे पिकांना पाणी द्यावे. ज्यांच्याकडे पाणी नाही, त्यांनी पोटॅशियम नायट्रेटची पिकावर फवारणी करावी.
- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव
फोटो०७ - सोयाबीन, कोपरगाव