विखे म्हणाले, मी तुमचाच सहकारी; ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:22 IST2017-12-08T17:20:09+5:302017-12-08T17:22:29+5:30
शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल.

विखे म्हणाले, मी तुमचाच सहकारी; ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल
लोणी : शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल. त्यामुळे येत्या १२ डिसेंबरला आम्ही याच प्रश्नावर मोर्चा काढणार आहोत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले.
लोणी येथे ऊस उराच्या प्रश्नावरुन शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला विखे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी विखे यांनी आंदोलकांच्या मागण्या समजावून घेतल्या. तसेच एफआरपी आणि त्यावर २०० रुपये ऊस दर देण्याची तयारी आम्ही दर्शविली होती. आता सरकारनेच या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. खासगी साखर कारखानदारीचे विवरणपत्र दाखल होत नाही, सार्वजनिक होत नाही़ मात्र, सहकारी कारखानदारीवरच सर्वजण तुटून पडतात.
दरवर्षी ऊस दराचा प्रश्न चिघळतो. गाळप व्यवस्थित झाले, साखर उतारा चांगला मिळाला तर शेतक-यांनाही चांगला भाव देता येईल. आज शेतक-यांना २४०० रुपये दर देताना प्रवरा कारखान्याला ७० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावले आहे़ ऊस दराचा प्रश्न चर्चेने सुटू शकतो. त्यामुळे संघटनांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असे विखे म्हणाले. यावेळी डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे, अजय महाराज बारस्कर, डॉ. संदीप कडलग, कॉ. बन्सी सातपुते, संतोष वाडेकर, रुपेंद्र काळे, निलेश तळेकर, सुभाष येवले, बच्चू मोढवे, अशोक पठारे, जनार्दन घोगरे, राजेंद्र बावके, चांगदेव विखे, जालिंदर चोभे, विलास कदम, युवराज जगताप, अनिल औताडे, साईनाथ घोरपडे, शिवराज शेटे, गोरक्ष साळुंके, दिगंभर भोसले, प्रकाश मालुंजकर यांच्यासह शेतकरी आंदोलक उपस्थित होते.