नवरदेवाच्या ताटाला वटकण लावण्यावरून रेशीमगाठ सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:24+5:302021-06-22T04:15:24+5:30
कर्जत : लग्न समारंभ आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवू घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधू पक्षाकडून वटकण (काही ...

नवरदेवाच्या ताटाला वटकण लावण्यावरून रेशीमगाठ सुटली
कर्जत : लग्न समारंभ आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवू घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधू पक्षाकडून वटकण (काही रक्कम देणे) लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. मात्र, हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांची रेशीमगाठ सोडण्यास कारणीभूत ठरल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (दि.२०) घडला.
सिद्धटेक येथील मुलगा रविवारी नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला. पुढे कन्येला पाठवणीच्या पूर्वी वधू-वरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथेप्रमाणे वधू पक्षाकडून २०० रुपये वटकण म्हणून ताटाला लावण्यात आले. तेथेच वाद पेटला.
वटकण लावलेल्या २०० रुपयांवर वर पक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. त्यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होऊ लागली. वधू पक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. रुसवे फुगवे टोकाला गेले. वधू पित्याने मुलीची पाठवणी न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ग्रामस्थांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा गोंधळ सुरूच राहिला. यात वर पक्षाने अखेर पोलीस स्टेशन गाठले.
हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे तत्काळ विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधू पित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते निर्णयावर ठाम होते. नववधू सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला. मात्र, तिनेही सासरला न जाण्याचा निर्णय स्पष्ट केला. शेवटी वर पक्षाकडील मंडळींना वधूविना घर गाठावे लागले.