भिडे, एकबोटे यांना अटक करा; दलित संघटनाचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:18 IST2018-01-05T13:49:26+5:302018-01-05T14:18:09+5:30
कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

भिडे, एकबोटे यांना अटक करा; दलित संघटनाचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्त्व अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी केले. मोर्चात छावा व मराठा महासंघ सहभागी होणार असून, हा मोर्चा कुठल्याही जाती विरोधात काढण्यात आलेला नाही तर कोरेगाव-भीमा प्रकरणावरुन मराठा व दलितांमध्ये फुट पडणा-या मनुवाद्यांविरोधात हा मोर्चा असल्याचे साळवे यांनी यावेळी सांगितले.
मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी व त्यांच्या संघटनेवर कायमस्वरुपी बंद आणावी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी हिंसाचार रोखण्यात कुचराई केल्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावे, हिंसाचारग्रस्त भागातील जिवीत व वित्तहानीबाबत अहवाल तयार करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी त्यासाठी ज्या इमारतींवर ही दगडफेक करण्यात आली, त्या इमारत मालकांना सहआरोपी करुन त्यांच्याकडून नुकसानभरपाईची रक्कम वसूल करावी, भीमा-कोरेगाव दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी २५ लाख व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई देण्यात यावी तसेच मयताच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात अनंत लोखंडे, जयंत गायकवाड, नाना पटोले, सुरेश बनसोडे, रोहित आव्हाड, नितीन कसबेकर, सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे, सुनील उमाप,विनोद भिंगारदिवे, पंडित वाघमारे,संतोष गायकवाड,संजय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते.