शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 16:18 IST2022-05-08T16:17:25+5:302022-05-08T16:18:41+5:30
अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत तर बहीण- भावाच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना
अहमदनगर - शेततळ्यातील पाण्यात भावाचा पाय घसरून तो बुडत असताना, मदतीसाठी धावलेल्या बहिणीचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. ८)सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे घडली. जयश्री बबन शिंदे (वय २१),आयुष बबन शिंदे (वय ७), असे मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. रविवारी सकाळच्या सुमारास, मुलगी जयश्री आणि मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्याच्या कडेला खेळत असताना त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली मात्र दोघेही पाण्यात बुडाले.
जयश्री व आयुष हे दोघे बहीण - भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. धीरज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत तर बहीण- भावाच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.