दुकाने, हॉटेल रात्री दहापर्यंत खुली राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:11+5:302021-08-14T04:26:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, रेस्टारंट, हॉटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली ...

दुकाने, हॉटेल रात्री दहापर्यंत खुली राहणार
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, रेस्टारंट, हॉटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी रविवार, १५ ऑगस्टपासून होणार आहे. लग्नसोहळे संबंधित लॉन, मंगल कार्यालयाच्या ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त २०० जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र नगर जिल्ह्यात दिवसाला सातशे ते आठशे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी आदेश काढून निर्बंध शिथिल केले. या आदेशाची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे. ज्यांचे लसीकरण झालेले आहे, अशांना जिल्ह्यात विनाअट प्रवेश असेल, मात्र लसीकरण न झालेल्यांना ७२ तासात कोरोना चाचणीचा अहवाल आवश्यक असणार आहे.
--
अशा राहतील अटी
१)उपहारगृहे - खुली किंवा बंदिस्त असलेली उपाहारगृहे आसनक्षमतेच्या ५० टक्के, नियमांचे पालन अनिवार्य, काम करणाऱ्या सर्वांचे दोन्ही लसीचे डोस झालेले असावेत.
२) दुकाने, शॉपिंग मॉल्स -जिल्ह्यातील सर्व दुकाने सर्व दिवस रात्री दहापर्यंत सुरू राहतील. कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत.
३) जिम्नॅशियन, योग सेंटर, सलून-स्पा- वातानुकूलित आणि विनावातानुकूलित असलेल्या योगा सेंटर, जिम्नॅशियन, सलून यांनाही रात्रीही १० पर्यंत परवानगी. मात्र हवा खेळती ठेवण्याच्या सूचना
४) इनडोअर गेम्स- इनडोअर स्पोेर्ट्स असलेल्या ठिकाणी सर्व प्रकारचे खेळ सुरू करण्यास परवानगी
५)शासकीय, खासगी कायार्लये- कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेल्या कार्यालयांनी पूर्ण क्षमतेने कर्मचाऱ्यांची हजेरी. खासगी कार्यालयांना त्यांची कार्यालये २४ तास खुली ठेवण्यास परवानगी.
६) मंगल कार्यालये- बंदिस्त मंगल कार्यालयात क्षमतेच्या ५०टक्के व जास्तीत जास्त १०० जणांची मर्यादा, लॉनवर क्षमतेच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २०० जणांची मर्यादा.
----
हे बंदच राहतील
१) सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स
२) सर्व धार्मिक स्थळे
३)वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम
४)निवडणूक प्रचार सभा, मिरवणुका, मोर्चे
-----
लसीचा दुसरा डोस अनिवार्य
दुकाने, हॉटेल, रेस्टारंट रात्री दहापर्यंत, कार्यालये २४ तास कार्यरत ठेवण्यास परवानगी देताना लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस होऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत. तापमान तपासण्यासाठी थर्मामीटर असणे आवश्यक आहे. लसीचे दोन डोस झाले की नाही हे पाहण्यासाठी दुकानांवर तपासणीसाठी पथक कार्यरत राहणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
-------------