शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:58 IST2018-08-14T13:55:21+5:302018-08-14T13:58:18+5:30
सन १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारत - पाक युध्द सुरू झाले. हातबॉम्ब फेकण्यात प्रसिद्ध असलेले यादव कांबळे यांना काश्मीरमधील पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले.

शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे
सन १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारत - पाक युध्द सुरू झाले. हातबॉम्ब फेकण्यात प्रसिद्ध असलेले यादव कांबळे यांना काश्मीरमधील पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले. यादव कांबळे यांनी केलेल्या हवाई बॉम्ब हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. परंतु पाकिस्तानचा एक बॉम्ब यादव कांबळे या वीरपुत्राच्या अंगावर पडला आणि भारतमातेच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढता लढता बहादूर यादव कांबळे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी शहीद झाले.
यादव कांबळे यांचे मूळ गाव नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील. येथील गणपत व देऊबाई कांबळे यांना गुणाजी, माधव, गजानन यांच्यानंतर १ जून १९४९ रोजी यादव याच्या रुपाने कांबळे परिवारात चौथे पुत्ररत्न प्राप्त झाले. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे थोडे वय वाढताच गणपतराव यांच्या मुलांनी रोजगार शोधण्यास सुरुवात केली. यादव यांनी तिसरीतून शाळा सोडली. तालुक्यातील अन्य तरूण धरत होते तीच वाट त्यांनीही शोधली व सैन्यात भरती होण्याची धडपड सुरू केली.
१० डिसेंबर १९६८ ला पुण्यात सैन्य दलाची भरती होती. या भरतीला यादव कांबळे हे रांगेत उभे राहिले. सहा फूट उंची, मजबूत बांधा आणि चपळ शरीरयष्टी असल्याने पहिल्याच प्रयत्नात तरणेबांड यादव कांबळे सैन्यात भरती झाले. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या कांबळे कुटुंबातील यादव सैन्य दलात भरती झाल्याने आई - वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पुण्यात पूर्ण केला. प्रशिक्षण पूर्ण करुन भारतीय सैन्य दलाची वर्दी अंगात घालून मोठ्या रुबाबात चिंचोडीपाटीलमध्ये आले.
मुलगा वयात आल्याने त्याचे हात पिवळे करण्याचा निर्णय आई - वडिलांनी घेतला. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील दामोदर पाटोळे यांची कन्या शालनबाई यांच्याशी विवाह निश्चित केला. १९७१ मध्ये यादव व शालनबाई यांचा विवाह झाला. लग्नाची हळद ओली असतानाच भारत - पाक यांच्यात युध्द सुरू होण्याचे संकेत मिळाले. यादव यांना तत्काळ पुण्याला हजर होण्याची तार आली. यादव यांनी भारतीय सैन्याची वर्दी अंगावर चढविली. पत्नी शालनबाई हिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि पुणे गाठले.
भारत - पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले होते. यादव कांबळे यांना हातबॉम्ब फेकीचे प्रशिक्षण दिले असल्याने त्यांना पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले. पाकिस्तानकडून हवाई हल्ले सुरू होते. भारताचे ११ बंकर उडविले गेले, अशा परिस्थितीत भारतीय जवान प्राणाची बाजी लावून युद्ध भूमिवर लढत होते. अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा भारतीय सैन्याने केला. यामध्ये चिचोंडी पाटीलचा यादव कांबळे आघाडीवर होता. यादव कांबळे यांच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणले होते. तेरा दिवस चाललेल्या युद्धात भारताच्या विजयाचा तिरंगा झेंडा रणभूमिवर फडकण्याच्या एक दिवस अगोदर यादव कांबळे यांच्या तुकडीवर हवाई हल्ला करण्यात आला. या बहादुराला ११ डिसेंबर १९७१ ला वीरमरण आले. भारतमातेचा पुत्र यादव कांबळे हा शहीद झाल्याची तार आली. चिंचोडीपाटील व घारगाव परिसरात शोककळा पसरली.
यादव कांबळे यांना वीरमरण आले. नुकतेच लग्न झालेल्या शालनबाई यांच्या कपाळाचे सौभाग्याचे कुंकू पुसले गेले. शालनबाई यांच्यापुढे अंधार झाला. शालनबाई यांच्या पोटात तीन महिन्यांचे बाळ होते. या दु:खातून शालनबाई सहा महिने सावरल्या नाहीत. त्यानंतर शालनबाई यांनी घारगावला राहणे पसंत केले. मिळणाºया पेंशनवर गुजराण सुरू केली. आई - वडील वृद्धापकाळाने वारले. दोन भाऊ नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतात. शालनबाई यांचा भाचा अमोल व कल्पना यांनी मोलाचा आधार दिला. ३७ वर्षांचा काळ पती यादव यांच्या फोटोकडे पाहून लोटला. जीवनात अनेक अडचणी आल्या पण पतीची ऊर्जा घेऊन सर्व प्रसंगावर शालनबार्इंनी मात केली.
शालनबार्इंना दुसरा धक्का
शालनबाई यांनी आपले दु:ख सावरले. मुलगा झाला तर भारतमातेला देऊन टाकण्याची शपथ घेतली. शालनबाई यांच्यापोटी मुलाने जन्म घेतला. वंशाचा दिवा पेटला आणि यादवराव यांची पोकळी काही प्रमाणात कमी झाली. कांबळे -पाटोळे परिवारात जल्लोष झाला. झालेल्या मुलाचे नावही यादव ठेवण्यात आले. बाळ दहा महिन्याचे असताना आजारी पडले. पुण्याला दवाखान्यात नेले पण उपचारादरम्यान या मुलाचे निधन झाले. मुलाच्या निधनानंतर शालनबार्इंना दुसरा धक्का बसला.
गावात स्मारक उभे राहण्याची इच्छा
देशासाठी प्राणाची आहुती देणा-या पतीची आठवण राहावी म्हणून एक छोटे स्मारक उभे राहावे अशी अंतकरणात दडलेली इच्छा आहे. त्यासाठी घारगावकरांनी पुढाकार घेतला तर आत्मीक समाधान लाभेल, अशी भावना वीरपत्नी शालनबार्इंनी व्यक्त केली.