नगरमध्ये खून करून तरुणाचा मृतदेह दरीत जाळला; १० दिवसांनी घटनेचा उलगडा, मृतदेहाची विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:56 IST2025-03-03T18:55:31+5:302025-03-03T18:56:09+5:30
पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला.

नगरमध्ये खून करून तरुणाचा मृतदेह दरीत जाळला; १० दिवसांनी घटनेचा उलगडा, मृतदेहाची विल्हेवाट
अहिल्यानगर : पूर्व वैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणाची अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शहरापासून दूर असलेल्या केकताई डोंगर परिसरात नेऊन जाळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय १९ वर्षे, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. टोळीच्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरुण नायकोडी हा २२ फेब्रुवारी रोजी सकाळी तपोवन रोड परिसरातील सलूनच्या दुकानात आला होता. त्यावेळी त्याला आरोपींनी गाठले, त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून तपोवन रोड इथून वडगाव गुप्ता रोडवरील निर्जनस्थळी नेले. तिथे त्याला आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला.
दरम्यान, मुलगा घरी न आल्याने मयताच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात २७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला अपहरण असावे, असा पोलिसांचा अंदाज होता, मात्र आठ दिवस उलटूनही तरुण घरी न आल्याने पोलिस व नातेवाईक यांचा संशय वाढला, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून खून केला असल्याची कबुली दिली आणि तेथूनच प्रकरणाला एक दिशा मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना सोबत घेऊन केकताई डोंगर गाठला. डोंगरातील एका दरीमध्ये मृतदेह जाळल्याचे समोर आले.
मयत तरुणाला मारताना आणखी कोण कोण सोबत होते? याचाही पोलिसांनी शोध घेतला. त्यामुळे आणखी चार आरोपी यात निष्पन्न झाले असून एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.