धक्कादायक! प्रेमाचे जाळे टाकून ११ महिन्यांत ४५४ अल्पवयीन मुलींना पळवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:06 IST2024-12-05T15:03:40+5:302024-12-05T15:06:45+5:30
प्रेमाचे आमिष दाखवून पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

धक्कादायक! प्रेमाचे जाळे टाकून ११ महिन्यांत ४५४ अल्पवयीन मुलींना पळवले!
अण्णा नवथर, अहिल्यानगर : गेल्या ११ महिन्यांत शहरासह ग्रामीण भागातून ४५४ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक १४ ते १७ वयोगटातील मुलींचा समावेश आहे. तसेच ८२ अल्पवयीन मुलेही घरातून गायब झाली असून, ६७ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जराशी समज येण्याच्या वयातच प्रेमाचे आमिष दाखवून पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची दररोज एक तरी तक्रार दाखल होते. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक पोलिस ठाणे गाठतात. न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करून घेतली जाते. मुलीचा शोध घेतला असता ती मित्रासोबत, शेजाऱ्यासोबत, ओळखीच्या व्यक्तीसोबत पळवून गेल्याचे समोर येते. मुलीचा शोध लागल्यानंतर नातेवाईक संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. पोलिसांना अशा प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो. परंतु काही प्रकरणांत मुलगाही अल्वयीन असतो. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होतो. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन तिला पोलिस ठाण्यात आणले जाते. मात्र, काही मुली नातेवाइकांसोबत जाण्यास सपशेल नकार देतात. काही प्रकरणांत पळवून नेलेल्या मुली १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत घरी येत नाहीत. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर थेट लग्न करूनच घरी येतात. नातेवाइकांनी स्वीकारल्यास थांबतात नाही तर स्वतंत्रपणे राहणे पसंत करतात. अशाही घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये मुलींच्या पालकांना त्रास सहन करावा लागतो.
पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान सुरू
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील हरवलेले, पळवून नेलेले मुली, मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान ऑपरेशन मुस्कान राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मुले व मुलींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.