शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील यांचा पुढील फेरीत प्रवेश
By सुदाम देशमुख | Updated: March 27, 2025 23:32 IST2025-03-27T23:32:05+5:302025-03-27T23:32:51+5:30
संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशी १२५ वजनी गटात रंगल्या कुस्त्या

शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील यांचा पुढील फेरीत प्रवेश
कर्जत : ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशीही ६१ किलो आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात माती आणि गादी विभागात रोमहर्षक कुस्ती साखळी सामने पार पडले. याच कुस्तीतून महाराष्ट्र केसरी किताबासाठी विजेता ठरणार आहे. नांदेडचा शिवराज राक्षे व पृथ्वीराज पाटील यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
गुरुवारी पहिल्या सत्रात गादी विभागातून झालेल्या लढतीत संग्राम पाटील (कोल्हापूर), ओंकार हुलावळे (वाशीम), सुदर्शन मुळे (लातूर), शिवराज राक्षे (नांदेड), अनिल राठोड (छत्रपती संभाजीनगर), अण्णा येमकर (सांगली), रमेश बहिरवळ (बीड), पृथ्वीराज पाटील (मुंबई), मनीष इंगळे (बुलढाणा), देवीदास खंदारे (परभणी), विकास गटकळ (धाराशिव) आणि शुभम माने (सोलापूर) यांनी दिमाखात पुढील फेरीत प्रवेश केला.
जय कदम (सातारा), तुषार सोनवणे (अहिल्यानगर), अतुल धावरे (कोल्हापूर) आणि प्रतीक भक्त (जालना) यांना समोरील मल्लांकडून बाय देण्यात आला. बहुचर्चित नांदेडच्या शिवराज राक्षेने अमरावतीच्या पवन घुणारे याच्यावर चढाई करीत ५ गुणांनी विजय मिळवला. मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलने रत्नागिरीच्या संस्कार लटकेवर १० गुणांनी विजय मिळवत आपला दावा पुढील फेरीच्या लढतीवर ठोकला.
अनेक नामवंत मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या केल्या. काहीकाळ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत श्वास रोखणाऱ्या कुस्त्या केल्या. मात्र ज्याचा खेळ सर्वोत्तम झाला त्यास पुढील फेरीत प्रवेश मिळाला. १२५ किलो वजनी गटातून महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत होणार असल्याने आजच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. संध्याकाळी माती विभागात पार पडलेल्या कुस्ती लढतीत या मल्लांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला.
याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. एकलपीठ न्यायालयाचा निकाल आणि अधिकार क्षेत्रासंबंधीचा आदेश तथा निरीक्षणे रद्द केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठास या प्रकरणाची सुनावणी गुणवत्तेवर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या परवानगीने दि.७ एप्रिलला हे प्रकरण यादीत घेऊन त्यावर सुनावणी घेण्याचा आदेश दिला, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वजनी गट निहाय विजेते
५७ किलो गट गादी विभाग : सचिन मुरकुटे सुवर्ण (कर्जत, अहिल्यानगर), सचिन चौगुले रौप्य (मुंबई शहर), चेतन यमगर (जळगाव) आणि वैभव चंद्रकांत (सोलापूर) कांस्य पदक. ६५ किलो गट गादी विभाग : विशाल सूळ सुवर्ण (सातारा), हर्षवर्धन बळवकर राैप्य (मुंबई), प्रितेश भगत (कल्याण) आणि आकाश नगरे (बीड) कांस्य पदक. ७४ किलो गादी विभाग : आकाश दुबे सुवर्ण (पुणे शहर), केतन घारे रौप्य (पुणे जिल्हा), भूषण पाटील कांस्य पदक (नाशिक शहर). ५७ किलो माती विभाग : अजित कुद्रेमानकर सुवर्ण (कोल्हापूर), यश बुछगुडे रौप्य (पुणे), विशाल सुरवसे कांस्य पदक (सोलापूर). ६५ किलो माती विभाग : सूरज कोकाटे सुवर्ण (पुणे), तेजस पाटील रौप्य (सांगली), अनिकेत शिंदे (सोलापूर) कांस्य पदक. ७४ किलो माती विभाग : सागर वाघमोडे सुवर्ण (पुणे), श्रीकांत दंडे रौप्य (पुणे), प्रकाश कार्ले (अहिल्यानगर) कांस्य पदक.