महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाने विरोधी पक्षांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. याचा परिणाम म्हणून इंडिया आघाडी आता विघटित होताना दिसत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर केला. आज शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या दोन दिवसीय महाविजयी अधिवेशनाच्या समारोप समारंभात केंद्रीय मंत्री शाह बोलत होते.
वाल्मिक कराडला मकोका व खून प्रकरणात आरोपी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, २०२४ वर्षाचा अंत महाराष्ट्र भाजपने केला आहे आणि आता २०२५ ची सुरुवात दिल्ली भाजपने तेथे विजय नोंदवून होईल. महाराष्ट्रात काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष वेधत शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये असा विजय मिळवण्याचे आवाहन केले की विरोधी पक्षांना बसण्यासाठीही जागा मिळणार नाही. पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचा झेंडा फडकवला पाहिजे, असंही शाह म्हणाले.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
अमित शाह म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण प्रत्येक घटक जिंकू या संकल्पाने आपल्याला साई नगरी सोडावी लागेल आणि येणाऱ्या काळात आपण भाजपला इतके मजबूत करू की कोणीही आपल्याला विश्वासघात करण्याचे धाडस करू शकणार नाही.
खासदार शरद पवार यांच्यावर टीका
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. शाह म्हणाले की, शरद पवार १९७८ पासून महाराष्ट्रात तोडफोडीचे राजकारण करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे राजकारण जमिनीखाली २० फूट गाडले आहे, असा निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपला दगा दिला. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय विचारसरणीचा त्याग केला. महाराष्ट्राच्या जनतेनेही त्यांनाही धडा शिकवला आहे. काही निवडणुका फक्त सरकार बदलण्यासाठी घेतल्या जातात. पण काही निवडणुका देशाचे राजकारण बदलण्याचे काम करतात. २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनी देशाचे राजकारण बदलण्याचे काम केले आहे. या निवडणुकीने उद्धव ठाकरेंना त्यांची जागाही दाखवून दिली आहे, असंही केंद्रीय मंत्री शाह म्हणाले.
खरी शिवसेना कोणाची हे जनतेने सांगितले : अमित शाह
"खरी शिवसेना कोणाची हे जनतेने स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे. शाह म्हणाले की, आमचे विरोधक विधानसभा निवडणुकीत तसेच लोकसभा निवडणुकीत आमच्या पराभवाचे स्वप्न पाहत होते. पण भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने मिळालेल्या प्रचंड विजयामुळे त्यांची स्वप्ने भंग झाली आहेत. या निवडणुकीने कुटुंबवादाचे राजकारणही नाकारले आहे, असा निशाणा शाह यांनी साधला.