Bhagat Singh Koshyari : शरद पवार, नितीन गडकरी देशाचे चमकते तारे - राज्यपाल; पवार व गडकरींना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:29 IST2021-10-29T07:28:31+5:302021-10-29T07:29:06+5:30
Bhagat Singh Koshyari : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. त्यामध्ये पवार व गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली.

Bhagat Singh Koshyari : शरद पवार, नितीन गडकरी देशाचे चमकते तारे - राज्यपाल; पवार व गडकरींना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ प्रदान
अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या देशाचे चमकते तारे आहेत. कोणतीही पदवी आणि पुरस्कारांच्या पलीकडचे त्यांचे काम आहे. विद्यापीठांनी धोरणे आखताना त्यांचा सल्ला घ्यावा, या शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांचे तोंडभरून कौतुक केले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. त्यामध्ये पवार व गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी दोघांवरही कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, पवार आणि गडकरी हे दोघेही केवळ कृषीच नव्हेतर, विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
पवार यांचे कृषी आणि सहकार क्षेत्रातील मोठे योगदान सर्वांनाच ठाऊक आहे. त्यासोबतच गडकरी अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे काम प्रेरणादायी आहे. रोज जसा नवा सूर्य उगवतो, तसे गडकरी नवा विचार घेऊन येतात, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करतात. माझी अशी धारणा आहे, जे चांगले आहे, ते कोठूनही स्वीकारले पाहिजे. त्यामुळे विद्यापीठांनी या दोघांच्या ज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.
अण्णांनी मोदींना दाखवला ग्रामविकासाचा रस्ता
पारनेर : अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीला ग्रामविकास, जलसंधारणाचा रस्ता दाखवला. आम्हाला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा तोच रस्ता दाखवला. अण्णा हजारे यांनीच राबवलेले सोलर वीज प्रकल्प मोदी यांनी हाती घेतल्याचे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक केले.