शंकरराव गडाख यांनी शनी देवस्थानच्या झोळीत हात घातला; राधाकृष्ण विखे पाटलांची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 23:05 IST2025-07-14T23:05:35+5:302025-07-14T23:05:58+5:30
भ्रष्टाचाराला उत्तर द्यावे लागेल असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं

शंकरराव गडाख यांनी शनी देवस्थानच्या झोळीत हात घातला; राधाकृष्ण विखे पाटलांची जोरदार टीका
Radhakrishna Vikhe Patil on Shankarrao Gadakh : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या झोळीत हात घातल्याचा आरोप जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही आता सुरू झाल्याचे विखे पाटील म्हणाले.
श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये उच्च दाब वीज केंद्राच्या भूमिपूजनासाठी विखे पाटील रविवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. माजी सभापती नानासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, आशिष धनवटे, गणेश मुद्गुले आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये अनागोंदी कारभार सुरू होता. खोटे अॅप बनवून कोट्यवधी रुपयांची भाविकांची लूट करण्यात आली. शनि चौथऱ्यावर टाकल्या जाणाऱ्या तेलातही तेथे भ्रष्टाचार झाला. कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेले रुग्णालय बंद आहे. कर्मचाऱ्यांची बोगस भरती केली गेली.
गडाख यांच्याच कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचाराशी संबंध आहे. या सर्व प्रकरणांमधून गडाख यांना जबाबदारी झटकता येणार नाही. गडाख यांना त्याचे प्रायश्चित्त मिळत आहे. शनिशिंगणापूरमधील भ्रष्टाचाराच्या प्रत्येक गोष्टीला त्यांना उत्तर द्यावे लागेल, असे विखे पाटील म्हणाले. या आरोपाबाबत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.