शंकराचार्यांचे ‘ते’ आरोप तथ्यहीन
By Admin | Updated: July 19, 2014 00:37 IST2014-07-18T23:33:46+5:302014-07-19T00:37:52+5:30
शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर केलेले आरोप हे तथ्यहीन, निराधार, कट्टरतावाद वाढवणारे व देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचवणारे असून

शंकराचार्यांचे ‘ते’ आरोप तथ्यहीन
शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर केलेले आरोप हे तथ्यहीन, निराधार, कट्टरतावाद वाढवणारे व देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचवणारे असून देशातील भोळ्या-भाबड्या जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे मत साधू-संतांच्या प्रतिनिधींनी शिर्डीत शुक्रवारी व्यक्त केले. साईबाबांचे धाम हे पूर्ण सनातन पद्धतीचे तसेच सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला़ शंकराचार्यांच्या आरोपाकडे समाजाने दुर्लक्ष करावे, असे आवाहनही या प्रतिनिधींनी केले़
शंकराचार्यांकडून होत असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, दिल्लीतील साईभक्त संजय साईनाथ यांनी हरिद्वार व दिल्लीतील साधू-संतांच्या प्रतिनिधींचा शिर्डी दौरा आयोजित केला होता़ या प्रतिनिधींमध्ये हरिद्वार येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता बाबा हटयोगी, कलकी पिठाधीश्वर प्रमोद कृष्णम, हरिद्वारचे महामंडलेश्वर स्वामी चिन्मयानंद, हरियाणाचे संत महासभेचे अध्यक्ष स्वामी कल्याणदेव, हरिद्वारचे महामंडलेश्वर स्वामी दुर्गादास, स्वामी नारायण गिरी आदींचा समावेश होता़
प्रतिनिधींनी शुक्रवारी शिर्डीत येऊन येथील मंदिरे, वस्तू संग्रहालय आदींना भेट देण्याबरोबरच मंदिरातील पूजापाठ व परंपरेची माहिती करून घेतली़ त्यांनी सायंकाळच्या धुपारतीलाही हजेरी लावली़
शंकराचार्यांवर टीका
बाबा हटयोगी यांनी शंकराचार्यांवर सडकून टीका केली़ ते उच्च पदावर असतानाही देशातील लोकांची दिशाभूल करीत असून त्यांचे आरोप तथ्यहीन व निराधार आहेत़ साईभक्त गंगेत स्रान करु शकतो, गंगा कुणाच्या मालकीची नाही, असे सांगतानाच द्वारका पीठाचे शंकराचार्य हे केवळ दसनाम संप्रदायाचे जगद्गुरू आहेत़ त्यांनी संपूर्ण देशाचे जगद्गुरू असल्याप्रमाणे समाजाला आदेश देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी शंकराचार्यांच्या सांप्रदायाचे असलेले स्वामी चिन्मयानंद यांनीही आपण शंकराचार्यांना याबाबत अहवाल सादर करु, असे सांगितले़