शनैश्वर देवस्थान ट्रस्टची कार्यालये कुलूपबंद; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्वीकारला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:42 IST2025-09-28T12:42:10+5:302025-09-28T12:42:29+5:30
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिवारी शनैश्वर देवस्थानच्या प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टची कार्यालये कुलूपबंद; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्वीकारला पदभार
सोनई (जि. अहिल्यानगर) : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिवारी शनैश्वर देवस्थानच्या प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर लगेच ट्रस्टच्या प्रशासकीय कार्यालयाला ‘सील’ ठोकण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, मंडळ अधिकारी विनायक गोरे, तलाठी सतीश पवार यांनी देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय, आस्थापना विभाग, संगणक विभाग, अकाउंट विभाग, प्रोसिडिंग रेकॉर्ड आदी कार्यालयांना ‘सील’ ठोकले. तसेच, देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेन गेटलाही
टाळे ठोकले.
विश्वस्तांचा हस्तक्षेप बंद
‘सील’ केलेल्या कुठल्याही विभागातील कार्यालयात कर्मचाऱ्यांना आता पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंद केला आहे. विश्वस्त मंडळ व कार्यकारी अधिकाऱ्यांचा कुठलाही हस्तक्षेप वा अधिकार आता देवस्थानात चालणार नाही.
यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर देवस्थानचे कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघ यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले. येत्या बुधवारी जिल्हाधिकारी परत शनिशिंगणापुरात येऊन कामकाज पाहणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्कार घेण्यास नकार
राज्य सरकारने दि. २२ सप्टेंबरला काढलेल्या आदेशानुसार, पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला. शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे डॉ. आशिया यांनी सांगितले. कार्यकारी अधिकारी गैरहजर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले गैरहजर होते. आपण आजारी असल्याने पुणे येथे उपचार घेत असल्याचे सांगितले.