दहिगावने : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
कोरोना महामारी शहरात आहे, असे म्हणता म्हणता गावात नव्हे वाडी- वस्त्यांवरच्या उंबऱ्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. मागील वर्षभरापासून शासन आदेश येईल त्याप्रमाणे जनता त्या आदेशाचे पालन करत आली आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेशीवरच रोखण्यात भावीनिमगावकर अपयशी ठरले आहेत. अनेक बेफिकीर व स्वच्छतेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांमुळे गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात शासन, प्रशासन व ग्रामपंचायतीला अपयश येत आहे. त्यामुळे ७ मेपासून ते १३ मेपर्यंत गावातील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन व पिठाच्या गिरणी (ठरावीक वेळेत) सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी व ग्रामपंचायत सदस्यांच्या आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
--
गावागावांतील नागरिकांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेऊन त्याचे काटेकोर पालन केले, तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होईल. ग्रामपंचायत व नागरिकांनी घोषित केलेल्या अशा जनता कर्फ्यूचा भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.
-अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव
---
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. खासगी वाहतूक बंद असल्याने वाहनाची व्यवस्था नसलेले नागरिक दहिगावने येथे कोरोना चाचणी करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कोरोना रॅपिड अँटिजन तपासणीची गावातच व्यवस्था होणे गरजेचे आहे.
-संतोष चव्हाण,
उपसरपंच, भावीनिमगाव