स्कॉलेजिअन्स : जिद्दी रुकसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 12:54 IST2019-03-05T12:54:02+5:302019-03-05T12:54:07+5:30
उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने सारेच पाहतात. मात्र नियती कायमच मार्गावर काटेरी बनवून खडतर करत त्यांची परीक्षा घेत राहते. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि अंगभूत प्रतिभेवर विश्वास असणारे मात्र नियतीवर मात करत यशस्वी होत आयकॉन ठरतात. शेवगावमधील रूकसार जावेद खतीबचा सीए होेण्यापर्यतचा हा प्रवास....

स्कॉलेजिअन्स : जिद्दी रुकसार
उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने सारेच पाहतात. मात्र नियती कायमच मार्गावर काटेरी बनवून खडतर करत त्यांची परीक्षा घेत राहते. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि अंगभूत प्रतिभेवर विश्वास असणारे मात्र नियतीवर मात करत यशस्वी होत आयकॉन ठरतात. शेवगावमधील रूकसार जावेद खतीबचा सीए होेण्यापर्यतचा हा प्रवास....
रूकसार जावेद खतीब. शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेताना आठवीत असताना तिने तिच्या आसपास राहणाऱ्यांना सीएची परीक्षा देताना पाहिले. सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. बस्स इथेच तिच्या मनात जिद्दीचे बीज पेरले गेले आणि तिने ठरवले. नियतीने तिची खडतर आणि महाकठीण परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यापुढे सीएची परीक्षा फारच सोपी वाटावी. पण दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रतिभा आणि अफाट जिद्दीच्या जोरावर रूकसारने साऱ्या वादळावर मात करत नियतीलाही पराभूत केले. हसत खेळत माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असतानाच नववीत आजाराचा सामना करावा लागला. असामान्य धैर्याने तिने खडतर आणि त्रासदायक उपचारासाठी स्वत:ला तयार केले. वर्षभराच्या उपचारानंतर ती आजारातून बाहेर पडली. बारावीला वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. बीकॉम साठी पुण्याच्या मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेताना समाजातील प्रतिगामी विचारांच्या लोकांचा विरोध आणि कुचेष्टेचा सामना तिच्यासह कुटुंबाला करावा लागला.
वडील रंगकामासारखा शाश्वत उत्पन्नाची हमी नसणारा व्यवसाय करतात. रूकसार, जस्मिन आणि शोएब या तीनही मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जीवाचे रान आई-वडील करतात. परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही पण मुलांच्या शिक्षणात काही कमतरता न राहण्याची ते काळजी घेतात. रुकसारच्या उपचारांवर लाखावर खर्च होऊनही शिक्षणासाठी त्यांनी माघार घेतली नाही.
मुलीच्या शिक्षणावर पैसे खर्च करण्यापेक्षा तिच्या लग्नावर करावा हा अनेकांचा अनाहूत सल्ला न जुमानता त्यांनी अनेकांच्या विरोधाला न जुमानता रूकसारला पुणे येथे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहात ठेवले. तिनेही त्यांच्या त्यागाची आणि विश्वासाची परतफेड करताना पहिली पायरी मोठ्या आत्मविश्वासाने पार केली. गेल्या महिन्यात पहिल्याच प्रयत्नात सीए होण्याचा मान तिने मिळवला. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या अनेक शिष्यवृत्यांनी तिचा शिक्षणाचा मार्ग सुकर केला. प्रा. नितीन मालानी, शोएब सर यांचा तितकाच मोलाचा वाटा आहे. या प्रवासात तिची आई यास्मिन यांचाही मोठा हातभार आहे.
आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांना न्याय मिळवून दिलाय. भविष्यात इन्शुअरन्स रिस्क मॅनेजमेंट क्षेत्रातील अॅक्च्युअरी सायन्स या क्षेत्रात करिअर करायचे आहे. - रूकसार खतीब
- उमेश घेवरीकर, शेवगाव