वाळू उपशाने बारागाव नांदूरची शांतता, सुरक्षितता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:14+5:302021-03-09T04:23:14+5:30
राहुरी : तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रालगत असलेल्या शेतजमिनीतून मातीमिश्रीत वाळू उपशाला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. ...

वाळू उपशाने बारागाव नांदूरची शांतता, सुरक्षितता धोक्यात
राहुरी : तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रालगत असलेल्या शेतजमिनीतून मातीमिश्रीत वाळू उपशाला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. परंतु संबंधित ठेकेदार थेट नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करीत आहेत. बोटी, पोकलेन, जेसीबी यांचा वाळू उपशासाठी वापर सुरू आहे. वाळू लिलावाच्या कारणावरून गावामध्ये रोज वादविवाद होत आहे. यामुळे गावातील शांतता, सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुळा नदीपात्रालगत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ३०० ब्रास माती मिश्रित वाळू उपशाला परवानगी देण्यात आली. संबंधित वाळू ठेकेदारकडून नदीपात्रात बोटी, पोकलेन, जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस वाळू उपसा केला जात आहे. मातीमिश्रीत वाळूच्या नावाखाली नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. गावातील काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ही वाळू वाहतुकीमध्ये हात धुवून घेण्यासाठी आपली वाळू वाहतुकीची वाहने ठेकेदारांच्या भिंतीला बांधली आहेत. दैनंदिन ५० ते ६० हायवा डंपरमधून हजारो ब्रास वाळू वाहतूक केली जात आहे.
दरम्यान रविवारी (दि. ७ मार्च) रात्री आठच्या सुमारास वाळू वाहतुकीचे डंपर बारागाव नांदूर ते राहुरी रस्त्याने वाहतूक करत असताना वाळू तस्करी करणाऱ्या पंटरानी गावातील कोतवालास रस्त्यातच अडवले. तू कोणाला फोन करत आहेस? असे विचारत तू महसूल अधिकाऱ्यास आमच्या तक्रारी करतोस का? असा सवाल करुन मारहाण केली. नवीन गावठाण हद्दीत मारहाण होत असताना ४० ते ५० जणांचा जमाव एकत्र आला. परंतु, वाळू लिलावामध्ये हात धुवून घेतलेल्या काही राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरण दाबून टाकले. यासह मागील पाच ते सहा दिवसांपासून गावात वाळू तस्करी करणाऱ्या दोन गटांमध्ये अंतर्गत वादविवाद सुरूच आहे. या वादातून डंपर अडवणे, पैसे मागणे, मारहाण करणे आदी प्रकार नित्याचेच घडत आहेत. परिणामी बारागाव नांदूर परिसरात रात्रीच्या वेळी तणावात्मक परिस्थिती असते. रोजच्या वाळूच्या ५० ते ६० वाहनांमुळे गावातील अंतर्गत रस्ते तसेच बारागाव नांदूर - राहुरी रस्ता, बारागाव नांदूर - बोरटेक रस्ता, बारागाव नांदूर - कुरणवाडी रस्ता उखडला आहे. प्रशासनाचा महसूल बुडून कोट्यवधी रुपयाचे खनिज लुटले जात आहे. तरीही महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पकडलेली वाहने अधिकारी सोडून देत आहेत.
...
बारागाव नांदूर येथील मुळा नदीपात्रातील मातीमिश्रीत वाळू लिलावाला परवानगी दिलेली आहे. ३०० ब्रासचा हा लिलाव आहे. ५ ते २४ मार्चपर्यंत हा वाळू लिलाव चालणार आहे.
- एफ. आर. शेख, तहसीलदार, राहुरी.