पाणी भरून रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:42 IST2021-04-21T05:41:44+5:302021-04-21T05:42:02+5:30
नगरमधील प्रकार; राज्यातही काळाबाजार करणारे अटकेत

पाणी भरून रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. नगर) : रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले असताना
राज्यात मात्र अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली.
श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. रईस अफजल शेख (रा. मातापूर), असे आरोपीचे नाव आहे.
कोल्हापुरात रॅकेट उघडकीस
कोल्हापूर : रेमडेसिविर हे अडीच हजार रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात १८ हजार रुपये किमतीला विकणारे रॅकेट कोल्हापुरात उघडकीस आले. रॅकेटमधील दोघांना मंगळवारी पहाटे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. योगिराज वाघमारे व पराग पाटील, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आली.
औरंगाबादेत काळाबाजार
करणारे चौघे कारागृहात
औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या गुन्ह्यात अभिजित नामदेव तौर, मंदार अनंत भालेराव, अनिल ओमप्रकाश बोहते आणि दीपक सुभाषराव ढाकणे यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी मंगळवारी दिला.
वाॅर्डबॉयने चोरले
१७ रेमडेसिविर
नागपूर : शुअरटेक रुग्णालयाचा वॉर्डबॉय ईश्वर मंडलने साथीदारांच्या मदतीने आठवडाभरात १७ रेमडेसिविर इंजेक्शन्स चोरली. १४ रेमडेसिविरची कथित पत्रकार व औषध वितरक विकास ऊर्फ लक्ष्मण पाटील याच्या मदतीने विक्री केली.