कोपरगावात बोगस व अप्रमाणित खतांची विक्री; खतामध्ये ९६ टक्के आढळली माती, २८ मे.टन साठ्यावर विक्रीबंदी आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:19 IST2026-02-12T17:17:40+5:302026-02-12T17:19:11+5:30
कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांसह खत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगावात बोगस व अप्रमाणित खतांची विक्री; खतामध्ये ९६ टक्के आढळली माती, २८ मे.टन साठ्यावर विक्रीबंदी आदेश
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (अहिल्यानगर) : तालुक्यात बोगस व अप्रमाणित खत विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कृषी विभागाने उगारला आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांसह खत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने आठ लाख रूपये किमतीचा २८.५० मे. टन खत साठ्यावर विक्री बंदी आदेश काढले आहेत.
कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रक गणेश बिरदवडे यांनी जानेवारी महिन्यात विविध दुकानांतून विक्री होणाऱ्या मिश्र खतांची तपासणी केली. तेव्हा मे. व्ही.के. फर्टीलायझर, देहूगाव, हवेली, पुणे व राहुरी, ता. अहिल्यानगर (दोन पत्ते) यांनी विपणन केलेले व मे. महालक्ष्मी फर्टीलायझर्स, कासेगाव, पंढरपूर यांनी उत्पादित केलेले २०:२०:०० या ग्रेड मिश्र खताचे नमुने गुण नियंत्रक गणेश बिरदवडे यांनी घेतले. तो नमुना दि. १३ जानेवारी रोजी पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. या नमुना तपासणीचा अहवाल कोपरगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयास २९ जानेवारी रोजी प्राप्त झाला.
प्राप्त झालेला अहवाल अतिशय धक्कादायक होता. या खतामध्ये ९६ टक्क्यांपेक्षा जास्त माती आढळून आली. म्हणजेच हे खत बोगस होते. हे खत अप्रमाणित होते. महालक्ष्मी फर्टीलायझरने उत्पादन केलेले व व्ही.के. फर्टीलायझरने विपणण केलेले हे खत कोपरगाव तालुक्यातील नऊ कृषी सेवा केंद्रांनी विक्री केले आहे. पैकी चार केंद्रांमध्ये ते कृषी विभागाला आढळून आले. त्या २८.५० मे.टन खताला विक्री बंदी आदेश कृषी विभागाने काढले आहेत. त्याची किंमत ७ लाख ८१ हजार रूपये आहे.
त्यानंतर गुण नियंत्रण अधिकारी बिरदवडे यांनी वरीष्ठांच्या आदेशाने दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री फिर्याद दिली. या फिर्यादीवरून व्ही.के. फर्टीलायझरचे व्यवस्थापकीय संचालक तुषार बाबासाहेब गरड (रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) व तालुका प्रतिनिधी ऋषी हरीश आभाळे (रा. मढी खु. ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांच्या विरूद्ध भा.न्या.सं. ३१८ (४), रासायनिक खते नियंत्रण आदेश ७, १२, १९ (सी ४, ५, ६, ७), २८, ३५ (१) (ए) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने करीत आहेत.
परवाना रद्द झालेल्या कंपनीच्या खतांची विक्री
मे. महालक्ष्मी फर्टीलायझर (पंढरपूर) कंपनीवर ऑगस्ट २०२५ मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या संचालकांनी (निविष्ठा व गुण नियंत्रण) या कंपनीचा परवाना कायम स्वरूपी रद्द केलेला आहे. तरीही त्या कंपनीच्या नावाने व्ही.के. फर्टीलायझर्स यांनी कोपरगाव तालुक्यात २०:२०:०० या खताची विक्री नऊ कृषी सेवा केंद्रांना केली होती.