आवर्तनाची टोलवाटोलवी
By Admin | Updated: July 20, 2014 00:21 IST2014-07-19T23:11:11+5:302014-07-20T00:21:26+5:30
श्रीगोंदा :कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी हिरवा कंदिल दिला़ मात्र, अंतिम मंजुरीसाठी कुकडी आवर्तनाचा चेंडू पुन्हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाणार आहे.

आवर्तनाची टोलवाटोलवी
श्रीगोंदा :कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी हिरवा कंदिल दिला़ मात्र, अंतिम मंजुरीसाठी कुकडी आवर्तनाचा चेंडू पुन्हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाणार आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडणे आवश्यक आहे. परंतु आवर्तनासाठी सुमारे २ टीएमसी पाणी पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉकमधून सोडावे लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे आयुक्त प्रभाकर देशमुख, नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांच्यात कुकडीतून पिण्याचे आवर्तन सोडण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक झाली. पाणी सोडण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखविली़ मात्र, भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून कुकडीतून पिण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्यानंतर आवर्तन सोडले जाणार आहे.
नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जुलै, आॅगस्टमध्ये पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांसमोरील पिण्याच्या पाण्याचे जलसंकट विचारात घेऊन श्रीगोंद्यातील ७४, पारनेर ३५, कर्जत ५ तर जामखेडमधील एका तलावात सुमारे ६१७ दलघफू पाणी पिण्यासाठी सोडावे, असा अहवाल तातडीने आयुक्तांना पाठविला होता़ या अहवालावर अद्याप निर्णय झालेला नाही़ कुकडीतून आवर्तन सोडावे, याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळाला पाठविला होता़ मंत्रिमंडळाने हा अहवाल परत पाठवून आयुक्तांनाच निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते़ मात्र, आयुक्तांनी पाणी सोडण्यावर सकारात्मक निर्णय घेऊनही पुन्हा मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सुटण्याची आशा पल्लवित झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)