बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतीची होणार पुन्हा निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:09+5:302021-02-06T04:36:09+5:30
जामखेड : तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतीच्या सर्व जागांची व साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका जागेची निवडणूक पुन्हा घ्यावी, ...

बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतीची होणार पुन्हा निवडणूक
जामखेड : तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतीच्या सर्व जागांची व साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका जागेची निवडणूक पुन्हा घ्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे येथील सरपंचपदाची निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील ४९ पैकी ४७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक होत आहे.
त्यापैकी ९ फेब्रुवारीला २४ व १० फेब्रुवारीला २३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक होत आहे. तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती; परंतु प्रभाग एकमध्ये सोमनाथ पवडमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केलेला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयातून पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून नेल्याची तक्रार निवडणूक अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती; परंतु त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवाराचा अर्ज फेटाळून निवडणूक बिनविरोध केली होती.
याप्रकरणी सोमनाथ पवडमल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यांनी सर्व निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली. त्यांची ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने मान्य करून वाकी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. १२ मार्च रोजी वाकी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.
साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील उमेदवार जिजाबाई कोल्हे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता व ही जागा बिनविरोध केली होती. त्यामुळे जिजाबाई कोल्हे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड पुढे ढकलली. प्रभाग दोनमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व साकत ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड पुढे ढकलल्याने ४७ ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड होत आहे. १६ ते २३ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे, २४ रोजी छाननी, २६ रोजी अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी दुपारी तीननंतर चिन्ह वाटप व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक वाटल्यास १२ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होणार आहे.