'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 19:16 IST2020-02-15T17:51:35+5:302020-02-15T19:16:11+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि़१५) दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला.

'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद
अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला. केडगाव येथील मटण उकड खाण्याची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना यावेळी ठाकरे यांनी बोलून दाखविली.
राज ठाकरे शनिवारी दुपारी केडगावमध्ये जेवणासाठी थांबणार असल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस फौजफौटा नगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये दाखल झाला. केडगाव येथील हॉटेलमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर होते. नेहमीचा पांढरा शुभ्र कुरता आणि काळा गॉगल घालून राज ठाकरे केडगावमध्ये थांबले. त्यांच्यासाठी स्वंतत्र कक्षात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांनी काळ्या मसाल्याचे मटण, बाजरीची भाकर व ताक असा आहार घेत मनसोक्त जेवण केले.
मनसेचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे यांच्या भेटीबाबत अनभिज्ञ होते. ही त्यांची जेवणासाठी खासगी भेट असल्याचे त्यांच्यासोबत असणा-या मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. हॉटेलमधील व्यवस्थापक सोडून त्यांनी जास्त कुणाशीही संवाद साधला नाही. त्यांचे छायाचित्र व सेल्फी काढण्यासाठी जमा झालेल्या त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी जवळ फिरकू दिले नाही. खूप सुंदर जेवण असा शेरा मारीत त्यांनी केडगावचा निरोप घेतला.