मंचरला वादळी वाऱ्यासह पाऊस
By Admin | Updated: May 21, 2016 01:21 IST2016-05-21T01:21:31+5:302016-05-21T01:21:31+5:30
वादळी वाऱ्याने शहरात बुधवारी सायंकाळी सात ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला

मंचरला वादळी वाऱ्यासह पाऊस
मंचर : जोरदार वादळी वाऱ्याने शहरात बुधवारी सायंकाळी सात ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. मुळेवाडी रस्त्यावर सुबाभळीचे मोठे झाड वीजवाहक तारांवर पडून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. रात्री उशिरा मंचर शहरातील वीजपुरवठा टप्याटप्याने सुरू करण्यात यश आले.
सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्याला प्रंचड वेग होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहरात ७ ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे यांनी दिली. मंचर ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द रस्ता येथे मुळेवाडी रस्त्यावर सुबाभळीचे मोठे झाड वीजवाहक तारांवर पडले. या झाडाने सर्वच रस्ता अडविला, तारा पडल्या गेल्या. तेथील एक वीजवाहक खांब मोडला.
सरपंच दत्ता गांजाळे, शिवकल्याण पतसंस्थेचे संचालक रंगनाथ थोरात तातडीने झाड पडलेल्या ठिकाणी गेले. तोपर्यंत रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. मोरडेवाडी येथे तब्बल ५ ठिकाणी झाडे तारांवर पडली होती. सायंकाळी पावसाने उघडीप देताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. संपूर्ण मंचर शहर व परिसर अंधारात बुडाला होता.
>वाहतूक ठप्प : झाड पडले
अवसरी बाजूनेही एक बाभळीचे झाड पडले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मुळेवाडी येथे काही उत्साही दुचाकीचालक शेजारच्या मक्याच्या शेतातून धोकादायकरीत्या वाहने नेत होती.सरपंच गांजाळे यांनी तातडीने झाड तोडण्याची व्यवस्था केली. रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या परिसरात सुद्धा सुबाभळीचे झाड वीजवाहक तारांवर पडले होते.