शेवगाव, जामखेड तालुक्यात पाऊस
By Admin | Updated: October 9, 2014 00:12 IST2014-10-09T00:09:31+5:302014-10-09T00:12:06+5:30
शेवगाव : शेवगावसह परिसरातील घोटण, कऱ्हेटाकळी, खानापूर, आंतरवाली, एरंडगाव आदी भागात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला.

शेवगाव, जामखेड तालुक्यात पाऊस
शेवगाव : शेवगावसह परिसरातील घोटण, कऱ्हेटाकळी, खानापूर, आंतरवाली, एरंडगाव आदी भागात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव, भातकुडगाव व ढोरजळगाव परिसरातील अनेक गावे अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यासह सर्वांची काळजी वाढली आहे. यंदाचा पावसाळा शेवगाव तालुक्यासाठी ‘कहीं खुशी कही गम’ अशा पद्धतीचा ठरला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा तब्बल अडीच महिन्याचा मोठा कालावधी कोरडा गेला. मध्यंतरीची आॅगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत समाधानकारक जोरदार पाऊस झाला. गणपती उत्सवानंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. मात्र मंगळवारच्या पावसाने कापूस, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात शेवगाव परिसरात ६३ मि.मी. तर एरंडगाव परिसरात ८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव व ढोरजळगाव परिसर पावसाबाबत निरंक असल्याची माहिती तहसील कार्यालयातून सांगण्यात आली.
गेल्या काही दिवसात उष्णतामान कमालीचे वाढले असून, जनता आॅक्टोबर हीटचा अनुभव घेत आहे. एकीकडे लांबलेला पाऊस तर दुसरीकडे भारनियमनात मोठी वाढ झाल्याने जनतेची कोंडी सुरू आहे.
(तालुका प्रतिनिधी)
जामखेडला पाऊस, रब्बीला जीवदान
जामखेडसह तालुक्यातील खर्डा, हळगाव, नान्नज, जवळा परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला होता. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाढली होती.
रब्बी ज्वारी पेरण्या तालुक्यात ५० टक्केपेक्षा जास्त झाल्या होत्या. काही ठिकाणी पिके उगवून आली होती. त्यामुळे या पिकांना पावसाची गरज होती. मंगळवारी जामखेड व व तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. जामखेड दोन मि.मी., नान्नज २४ मि.मि.,अरणगाव १०.५ मि.मी., नायगाव येथे दोन मि.मी. अशी पावसाची नोंद झाली होती.