रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा दहा रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:05+5:302021-06-24T04:16:05+5:30
अहमदनगर : कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ५० रुपये केलेले प्लॅटफाॅर्म तिकीट आता पुन्हा पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात ...

रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा दहा रुपये
अहमदनगर : कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ५० रुपये केलेले प्लॅटफाॅर्म तिकीट आता पुन्हा पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात आले आहे. दरम्यान, अनलाॅक झाल्यानंतर आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे.
दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. अशाही काळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांसोबत नातेवाईक गर्दी करीत असल्याने त्याला चाप बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले. त्यानंंतर काही दिवसांत प्रवाशांसोबत येणाऱ्यांची संख्या कमी झाली. दरम्यान, एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने रेल्वेचे प्रवासीही कमी झाले. कोरोना काळात लाॅकडाऊनपूर्वी नगर रेल्वेस्थानकातून दररोज ३० ते ३५ रेल्वे धावत होत्या. त्यातून साधारण १ हजार प्रवासी नगरहून प्रवास करत होते. परंतु लाॅकडाऊनमध्ये गाड्यांची संख्या घटून १० ते १२ वर आली, तसेच प्रवासीसंख्याही २०० ते २५० प्रतिदिन एवढी कमी झाली. आता १५ जूनपासून निर्बंध हटल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत पुन्हा वाढ होत आहे.
----------------
दररोज जाणाऱ्या रेल्वेची संख्या - १०
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३००
---------------
तिकीट वाढले तरी....
लाॅकडाऊनमध्ये प्लॅटफाॅर्म तिकीट वाढले तरी लाॅकडाऊनमुळे अनेक गाड्या बंद झाल्या. त्यामुळे प्रवासीही कमी झाले. परिणामी प्लॅटफाॅर्म तिकिटातून रेल्वेस्थानकाला फारशी कमाई झाली नाही.
-------------
प्रवासी वाढले...
१५ जूनपासून निर्बंध हटल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत पुन्हा वाढ होत आहे. नगरमधून उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. शिवाय नगरमध्ये लष्कराची दोन मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याने येथून सैनिकांची मोठी ये-जा असते. अनलाॅकनंतर सैन्याचा प्रवासही वाढला आहे.