वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:41 IST2024-12-10T13:41:16+5:302024-12-10T13:41:37+5:30

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Rahuri mystery of lawyer husband wife murder case While narrating the sequence of events the witness felt dizzy | वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

अहिल्यानगर : दहा लाख रुपयांसाठी राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून खुनाचा कट रचल्याचे माफीच्या साक्षीदाराने जिल्हा न्यायालयात सांगितले. खुनाचा घटनाक्रम सांगत असताना त्याला भोवळ आली. त्यामुळे कामकाज थांबवावे लागले. यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असून उर्वरित घटनाक्रम समोर येईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यावर जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयासमोर सोमवारपासून सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीचा सोमवारी पहिला दिवस होता. सुनावणीसाठी अॅड. उज्ज्वल निकम अहिल्यानगरला उपस्थित होते. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी वकील दाम्पत्याच्या खुनाची माहिती दिली. ते म्हणाले, राजाराम आढाव व मनीषा आढाव (दोघे, रा. मानोरी, ता. राहुरी) हे दोघे राहुरी न्यायालयात वकिली करत होते. त्यांचा २५ जानेवारी २०२४ रोजी निघृणपणे खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी बबन मोरे, किरण दुशिंग, शुभम महाडिक, सागर खांदे, हर्षल ढोकणे अशा पाच आरोपींना अटक केली आहे. यातील हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याची साक्ष नोंदविण्यात आली. वकील दाम्पत्याचे राहूरी न्यायालयातून अपहरण करून त्यांच्या मानोरी येथील घरी नेईपर्यंतचा घटनाक्रम त्याने सांगितला. ही माहिती सांगत असतानाच त्याला भोवळ आली. त्यामुळे न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले, असे निकम यांनी सांगितले. आरोपींच्या वतीने अॅड. सतीष वाणी यांनी बाजू मांडली, यावेळी न्यायालयात वकिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. वकील दाम्पत्याच्या खुनाचे प्रकरण राज्यभर गाजले होते. विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला आहे. वकिलांच्या मागणीनंतर हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

काय म्हणाला माफीचा साक्षीदार ? 

माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयात साक्ष दिली. घटनेच्या एक दिवस आधी आरोपींनी वकील दाम्पत्याच्या अपहरणाचा कट रचला. मयत राजाराम व मनीषा आढाव हे दोघे राहुरी न्यायालयात वकिली करत होते. आरोपी शुभम हा २५ जानेवारी २०२४ रोजी राहुरी येथील न्यायालयात गेला. त्याने मयत अॅड. राजाराम यांची भेट घेतली. मित्राचा पाथर्डी न्यायालयात आज जामीन आहे, तिकडे जायचे आहे, असे सांगून राजाराम यांना सोबत घेतले. त्यांना एका कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे त्यांना मारहाण केली व पत्नी मनीषा यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी मोहट्याला जायचे आहे.  तुला घेण्यासाठी शुभम कोर्टात येईल. त्याच्यासोबत तू ये, असे चलीला फोनवरून सांगितले. त्या सोबत आल्या व्यावेळी पतीचे हातपाय बांधलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पतीला बीपीचा त्रास आहे. त्यांचे तोंड बांधू नका, असे सांगितले होते. त्यानंतर आरोपींनी मनीषा यांना मारहाण केली व त्यांचे तोंड बांधण्यासाठी गमचा (दुपट्टा) मागितला. शुभमने त्यांना गमचा आणून दिला. दोघांचे तोंड बांधून त्यांना एका कारमधून त्यांच्या घरी नेण्यात आले. घराच्या चाव्या पत्नीकडे होत्या. त्या त्यांनी काढून आरोपीकडे दिल्या. त्यानंतर त्यांना आरोपीनी मारहाण केली, ईथपर्यंतची माहिती माफीचा साक्षीदार ढोकणे याने दिली आहे, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली.

दीड हजार पानांचे दोषारोपपत्र 

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खुनाचा तपास पूर्ण करून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी येथील जिल्हा न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले. त्यामध्ये आरोपींनी वकील दाम्पत्याचा निघृणपणे खून केल्याचे नमूद आहे. पैशांसाठी हा खून केला गेला. आरोपींनी आढाव यांच्या बैंक खात्यातून पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचेही तपासात समोर आलेले आहे, असे सांगण्यात आले.

गडी गेला घरी.. 

आरोपी वकील दाम्पत्याला घेऊन त्यांच्याच घरी गेले. त्यांच्या बंगल्यावर एक गडी होता. त्याला आरोपींच्या सांगण्यावरून अॅड. राजाराम आढाव यांनी फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा गड़ी घटना घडली त्यावेळी घरी नव्हता. आरोपींनी सावधपणे हा कट रचलेला होता. कुणालाही संशय येणार नाही, याची काळजीही आरोपींनी घेतल्याचे दिसते.
 

Web Title: Rahuri mystery of lawyer husband wife murder case While narrating the sequence of events the witness felt dizzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.