कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:17 IST2025-01-09T14:08:22+5:302025-01-09T14:17:07+5:30
पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे.

कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध!
Rauri Murder Case: राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील चहावाल्याने वकील दाम्पत्याच्या खुनातील आरोपी शुभम महाडिक याला ओळखल्याचं स्पष्ट झालं आहे. हत्येपूर्वी वकील दाम्पत्य राहुरीन्यायालयात आले होते. तेथून ते आरोपींसोबत त्यांच्या घरी गेले होते. या दरम्यान, त्यांना अॅड. रामदास बाचकर व चहावाला भाऊराव दादासाहेब तमनर यांनी पाहिलेले होते. या दोघांची साक्ष सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आली. या खून खटल्याची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार असून, शनिवार व रविवारी न्यायालय सुरू राहणार आहे. राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
पहिल्या दिवशी सोमवारी अॅड. रामदास बाचकर याची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी अॅड. राजाराम आणि मनिषा आढाव यांना राहुरी न्यायालयात येताना पाहिले होते. राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज बाचकर यांना सुनावणीच्या दरम्यान दाखवण्यात आले. त्यातील वकील दाम्पत्य व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आरोपींना बाचकर यांनी ओळखले, परंतु ते स्वतः एकाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत. त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी बुधवारी भाऊराव तमनर यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांची राहुरी न्यायालयात चहाची टपरी आहे. घटना घडली, त्या दिवशी अॅड. राजाराम आढाव यांच्या पत्नी मनिषा तमनर यांच्या टपरीवर आल्या होत्या. त्यांनी पाण्याची बाटली घेतली, परंतु पैसे द्यायचे विसरल्या होत्या. त्यामुळे त्या पैसे देण्यासाठी पुन्हा टपरीवर आल्या. त्यावेळी मॅडमने मी शुभम याच्यासोबत घरी चालले आहे, असे तमनर यांना दिली होती. तशी साक्ष तमनर यांनी दिली. त्यावर त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. आतापर्यंत चार जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या आहेत. यातील माफीचा साक्षीदार असलेल्या हर्षल ढोकणे याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. इतर तिघांनी घटनेपूर्वी न्यायालयातील माहिती दिली असून, आरोपींना ओळखले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी, तर आरोपींच्या वतीने अॅड. सतीश वाणी यांनी काम पाहिले.
बाटलीवरुन शोध लागला
घटनेच्या दिवशी वकील दाम्पत्य राहुरी न्यायालयात आले होते. यातील अॅड. मनिषा आढाव यांच्या हातात पाण्याची बाटली असल्याचे सीसीटीव्हीत दिसते. ही बाटली त्यांनी कुठून घेतली, हे मात्र स्पष्ट होते. त्यांनी पाण्याची बाटली चहाच्या टपरीवरून घेतली होती, अशी माहिती तमनर यांनी दिली. त्यावरून वकील मॅडम यांच्या हातात जी बाटली होती, ती त्यांनी चहाच्या टपरीवरून घेतली होती. पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे.