करंजी : कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन करून कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क आदी नियमांची पायमल्ली होत असल्याचे लक्षात येताच गटविकास अधिकाऱ्याच्या पथकाने काही दुकानदार, व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी सध्या कडक निर्बंध आहेत. फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरासाठी सक्ती केली. मात्र, करंजीसह परिसरातील अनेक गावात याचे पालन केले जात नाही. कोरोनाबाधित रुग्ण राजरोसपणे समाजात वावरताना दिसतात, तर बँक, किराणा दुकान, मेडिकल आदी ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्या पथकाने मंगळवारी गावात अचानक पहाणी करून शासनाच्या आदेशाचे पालन न करता व्यवसाय करणाऱ्या त्रिमूर्ती कलेक्शन्स, दत्तकृपा मेडिकल, उत्तरेश्वर मेडिकल, दळवी किराणा या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
करंजी येथील दुकानदार व व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या पथकात गटविकास अधिकारी शीतल खिंडे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, पशुधन विकास अधिकारी जगदीश पालवे, कृषी विस्तार अधिकारी मगर, कराळे, ग्रामविकास अधिकारी देशमुख, पोलीस कर्मचारी बेरडसह ग्रा. पं. सदस्य रोहित अकोलकर, नवनाथ आरोळे उपस्थित होते.
--
अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सबाबत खबरदारी घ्यावी. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
-प्रशांत तोरवणे,
विस्तार अधिकारी, पाथर्डी
--
०६ करंजी कारवाई
करंजी येथे नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करताना पथकातील अधिकारी.