सह्याद्री शाळेत वादाची घंटा

By Admin | Updated: June 27, 2014 00:18 IST2014-06-26T23:59:16+5:302014-06-27T00:18:25+5:30

अहमदनगर: येथील इंग्रजी माध्यमाच्या सह्याद्री शाळेतील शिक्षकांनी शिकविणे बंद केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़

Promotional bell in Sahyadri school | सह्याद्री शाळेत वादाची घंटा

सह्याद्री शाळेत वादाची घंटा

अहमदनगर: येथील इंग्रजी माध्यमाच्या सह्याद्री शाळेतील शिक्षकांनी शिकविणे बंद केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़ मुलांना का शिकविले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत पालकांनी गुरुवारी शाळा व्यवस्थापनास धारेवर धरले़ मात्र शाळा व्यवस्थापनाने पालकांनाच अरेरावीची भाषा केली़ त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून, शाळा सुरू होणार की बंद राहणार,याबाबत साशंकता आहे़
सावेडी उपनगरात इंग्रजी माध्यमाचे सह्याद्री पब्लिक स्कूल आहे़ स्कूल १६ जून रोजीच सुरू झाली़ मात्र मुलांना शिकविले जात नव्हते़ मुलांना होमवर्क दिला जात नसल्याने पालकांना शंका आली़ त्यामुळे काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे याबाबत चौकशी केली़ परंतु व्यवस्थापकांनी पालकांनाच सुनावले़ त्यामुळे गुरुवारी सकाळी सर्वच पालकांनी शाळेत धाव घेतली व शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला़ मुलांना शिकविले जात नाही़ व्यवस्थापनाकडून शाळा सुरू राहणार की बंद, याबाबत खुलासा करण्यात आला नाही़
आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचारणा केली असता पालक व व्यवस्थापनाची सकाळी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत शिक्षकांनी अरेरावीची भाषा वापरली़ तसेच महिलांकडून दमदाटीही करण्यात आली, असे पालकांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे हा वाद चिघळला असे काही पालकांनी सांगितले़
शिक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार देण्यात आले नाहीत़
शाळा सुरू झाली़ परंतु मागील पगारही अद्याप मिळाले नाहीत़ याविषयी संस्था चालकांशी चर्चा केली असता पगारासाठी पैसे नाहीत, असे शिक्षकांना सांगण्यात आले़ शिक्षक व व्यवस्थापनात पगारावरून वाद निर्माण झाला असून, शिक्षकांनी शिकविण्यास सपशेल नकार दिला़ त्यात मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्यातही अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे़ शाळा सुरू राहणार की बंद, याबाबत काही पालकांनी शिक्षकांकडे विचारणा केली असता शिक्षकांनी संस्थाचालकांकडे बोट दाखविले़
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षक व व्यवस्थापनात एकमत नसल्याने पालकांनी प्रवेश रद्द करण्याची भूमिका घेतली आहे़ तर व्यवस्थापन याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले
आहे़
(प्रतिनिधी)
सहा महिन्यांपासून शिक्षकांचे
पगार थकले
शाळेत शिक्षकांसह १५ कर्मचारी आहेत़ त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत़ त्यामुळे शिक्षकांनी काम बंद ठेवले असून, शाळेच्या सुरुवातीला काम बंद ठेवल्याने शाळा सुरू राहणार की बंद,याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे़
पालक पैसे भरत नाहीत़ आतापर्यंत १० टक्के शुल्कही जमा झाले नाही़ त्यामुळे शिक्षकांना पगार देण्यात आले नाही़ शिक्षकांनी काम बंद केले़ मात्र शाळा बंद होणार नाही़ नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात आली असून, व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांच्यात वाद आहेत़ व्यवस्थापक महिला असून, त्यांना सहकार्य केले जात नसल्यामुळे हा प्रकार घडला़ पालकांनी नियमित पैसे भरल्यास शाळा सुरू ठेवण्यास अडचण येणार नाही़शाळा सुरू ठेवण्यावर आपण ठाम आहोत़
- सुभाष म्हस्के, संस्थाचालक
मुलीला सोडायला शाळेत आलो असता सर्वच पालक आलेले होते़ काहींनी मुलांना शिकविले जात नसल्याची तक्रार केली़ याविषयी तातडीने व्यवस्थानपाने पालकांची बैठक घेतली़ या बैठकीत व्यवस्थापकांनी अरेरावीची भाषा करत बैठक गुंडाळली़ त्यानंतर शिक्षकांकडे विचारणा केली असता सहा महिन्यांपासून पगार नाही़ त्यामुळे काम बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ संस्थाचालकांनीही तुम्ही तुमचा निर्णय घ्या,असे सांगितले आहे़
- बाळासाहेब अनभुले, पालक
शाळा सुरू होऊन आठवडा उलटला़मात्र मुलांना शिकविले जात नाही़ परिसरात ही एकमेव शाळा आहे़ त्यामुळे दोन्ही मुलांचा प्रवेश घेतला़ परंतु सुरुवातीपासूनच हा गोंधळ सुरू झाला़ व्यवस्थापनाकडून अशी वागणूक मिळत आहे़ मुलांना शिकविले जात नसून, शिक्षकांना पगार नाहीत़ त्यामुळे ते शिकविणार कसे, त्यांचे योग्य आहे़ त्यांच्या वादात मुलांचे नुकसान होत आहे़
- संतोष झाडे, पालक

Web Title: Promotional bell in Sahyadri school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.