राज्य सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:37 IST2021-03-21T15:37:36+5:302021-03-21T15:37:44+5:30
खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

राज्य सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
संगमनेर : महाविकास आघाडी सरकार खंडणी गोळा करण्यासाठी पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातून समोर आले आहे. खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. आज संगमनेर बसस्थानकाबाहेर राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांंनी जोरदार निदर्शने करुन घोषणाबाजी केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, कल्पेश पोगूल, कांचन ढोरे, रेष्मा खांडरे, सुनीता खरे, ज्योती भोर, वैभव लांडगे, दिनेश सोमाणी, दिपक भगत, हरीष चकोर, विजय पठाडे, सुहास कतोरे, विकास गुळवे, मंगेश बुळकुंडे, भरत ढोरे, रोहिदास साबळे, अक्षय अमृतवाड आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात महिला असुरक्षित आहेत. साधुसंतांची हत्या होते आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब केला जात असून वीजजोडणी खंडित केली जात आहे. भ्रष्ट मंत्री, अधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.