शेवगाव तहसीलसमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:06+5:302021-07-27T04:22:06+5:30
शेवगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोमवारी (दि. २६) आठ महिने पूर्ण होऊनही केंद्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष ...

शेवगाव तहसीलसमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
शेवगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोमवारी (दि. २६) आठ महिने पूर्ण होऊनही केंद्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार रमेश काथवटे यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे, संजय नांगरे, बापूराव राशीनकर, कारभारी वीर, राम पोटफोडे, आत्माराम देवढे, काशीनाथ गरड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने कायद्यात रूपांतर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या हद्दीवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सोमवारी आठ महिने पूर्ण झाले आहेत. तरीही केंद्र सरकार त्या आंदोलनाची दखल घेत नाही. हा प्रकार निंदनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमीभाव लागू करावा. जनविरोधी वीजबिल विधेयक २०२० मागे घेण्यात यावे. शेतकऱ्यांसाठी युरिया खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात यावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने मनरेगासंदर्भातील केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. रोजगार हमी योजना, मजूर, शेतमजूर, बेघर, निराधार, कष्टकरी, भूमिहीनांच्या हिताच्या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
---
२६ शेवगाव आंदोलन
शेवगाव तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार रमेश काथवटे यांना देताना शेतकरी प्रतिनिधी.