श्रीरामपुरात ३५ तासांपासून वीज पुरवठा खंडित; पाणी पुरवठाही विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:11 IST2020-03-27T16:10:21+5:302020-03-27T16:11:35+5:30
बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला.

श्रीरामपुरात ३५ तासांपासून वीज पुरवठा खंडित; पाणी पुरवठाही विस्कळीत
श्रीरामपूर : बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला. वीजपुरवठा तातडीने सुरू होत असल्याबाबत शहरवासीयांना वारंवार चुकीची माहिती देण्यात आली.
बुधवारी सायंकाळी शहराला वादळी पावसाने झोडपून काढले. वा-याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी वीज प्रवाहाला अडथळे निर्माण झाले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून शहराला होणारा वीठ पुरवठा ठप्प झाला. विजेचे खांब कोलमडून पडल्यामुळे ३५ तास शहराचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरण कंपनीच्या वतीने धिम्यागतीने दुरूस्तीचे काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विजेअभावी नगरपालिकेच्या जलकुंभात पाणी भरता आले नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. संचारबंदीमुळे घरातून बाहेर पडण्याची मुभा नाही. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली.