शहरातील गोरगरीब अर्धपोटी उपाशीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:51+5:302021-06-24T04:15:51+5:30
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर गहू मिळाले, मात्र तांदळाची प्रतीक्षा करावी लागली. लॉकडाऊनमध्ये कामे नसल्याने गोरगरिबांना धान्याची गरज होती. ...

शहरातील गोरगरीब अर्धपोटी उपाशीच
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर गहू मिळाले, मात्र तांदळाची प्रतीक्षा करावी लागली. लॉकडाऊनमध्ये कामे नसल्याने गोरगरिबांना धान्याची गरज होती. आता अनलॉक झाले. कामेही सुरू झाली तरी लोकांना काही धान्य मिळेना, अशी स्थिती शहरातील गरजू नागरिकांची झाली आहे. एक धान्य आले तर दुसरे मिळाले नसल्याने लाभार्थींना अर्धपोटीच रहावे लागले.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ लाख लाभार्थींना दरमहा प्रत्येकी १० हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या लॉकडाऊनुमळे केंद्र व राज्य शासनाने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गटातील सर्व रेशन कार्डधारकांना प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात जिल्हास्तरावरून वितरित करण्यात आलेले धान्य रेशन दुकानदारांनी पूर्णपणे वितरित केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मे महिन्याचे धान्य कोरोनामुळे ई-पॉस मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रेशन दुकानदारांचेच थंब करायचे होते. त्यामुळे लाभार्थींना धान्य न देताच काही दुकानदारांनी धान्य वितरित केल्याचा अहवाल शासनाला सादर केल्याचे काही गावांतील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे गरजूपर्यंत धान्यच पोहोचले नसल्याचे दिसते आहे.
----------
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
मे महिन्यापर्यंत ई-पॉस मशीनवर लाभार्थींचा अंगठा घेण्यात येत होता. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणावरून मे महिन्यात रेशन दुकानदारांचाच अंगठा घेण्याचा निर्णय झाला.
परिणामी याचा दुरुपयोग अनेक दुकानदारांनी घेतल्याच्या तक्रारी लाभार्थी करीत आहेत.
प्रशासकीय पातळीवरूनही लाभार्थींना खरोखरच धान्य दिले गेले का? याची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्वित नाही.
--------------
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?
दुकानावर गेले की, धान्य नसल्याचे सांगितले जाते. २०-२५ जणांना धान्य नसल्याचे सांगून घरी पाठवले जाते. गहू मिळाला, तर तांदूळ दिला जात नाही. वाटपात नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. सर्व गरजूंना धान्य मिळाले पाहिजे.
-आकाश गाडे, सिद्धार्थनगर
-------------
मे महिन्यात धान्य मिळाले. जून महिन्यात केंद्राकडून मोफत धान्यही वितरित करण्यात आले; मात्र ते आम्हाला मिळालेच नाही. एकाच वेळी दोन पावत्या काढून एकच धान्य दिले तर काही ठिकाणी धान्यच वाटप झाले नाही.
-लक्ष्मीबाई शिंदे, नगर
-----------
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मोफत धान्य दिले जाते. गेल्या महिन्यात सरकारने केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानदार कोणालाच धान्य देत नसल्याचे दिसते आहे. मग आमचे धान्य गेले कुठे?
-जयंत जोशी, श्रमिकनगर
------------
जिल्ह्यातील रेशन कार्डधारक
बीपीएल-६,०५,५२४
अंत्योदय-८८,६१८
केशरी-३,३५,६६०
एकूण-१०,८८,३८५
--------------
नगर शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवर आतापर्यंत गव्हाचे पूर्णपणे वाटप झालेले आहे. गोंदिया येथे सरकारने खरेदी केलेला तांदूळ नगर जिल्ह्यासाठी पाठविण्यात आला आहे. अंतर दूर असल्याने तांदळाची उपलब्धता होण्यास वेळ लागला; मात्र बुधवारी नगर शहरासाठी ५१० क्विंटल तांदूळ मिळाला आहे, तो गुरुवारपासून वाटप होईल.
-अभिजित वांढेकर, अन्नधान्य वितरण अधिकारी, नगर
--
डमी