नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:34:01+5:302014-07-13T00:17:55+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षांनी निवड शुक्रवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले
अहमदनगर: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षांनी निवड शुक्रवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अंतर्गत गटबाजीने पक्षाचे प्रमुखही पेचात सापडले आहे. नगराध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली असून नाव अंतिम करताना पक्ष प्रमुखांचीही कसरत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय आढावा...
राहुरीत उषाताई तनपुरे निश्चित, देवळालीत उत्सुकता
राहुरी व देवळाली नगरपरिषद नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षदी कुणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ १८ जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. राहुरी नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी, तर देवळाली प्रवरा मागासवर्गीयासाठी राखीव आहे़ राहुरी नगरपरिषदेत जनसेवा मंडळाचे १६, नागरी विकास मंडळाचे ३ व अपक्ष १ असे बलाबाल आहे़ नगराध्यक्षपदासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. उषाताई तनपुरे यांचे नाव निश्चित आहे़ त्यामुळे अन्य कुणीही नगराध्यक्षपदासाठी दावा केलेला नाही़ उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाचेही नाव अद्याप निश्चित झालेले नाही़ इच्छुकांमध्ये राजेंद्र उंडे, भारी सरोदे, सोनाली उदावंत, अर्चना तनपुरे यांची नावे चर्चेत आहेत़ विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याने नगराध्यक्षपदी सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या उमेदवाराची बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता आहे़ देवळाली नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे ५, राष्ट्रवादी पुरस्कृत २, काँग्रेसचे ५, तर भाजपचे ६ नगरसेवक आहेत़ काँगे्रस व राष्ट्रवादी सत्तेत आहे़ नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती त्रिभुवन यांचे नाव चर्चेत आहे़ शिवाय भाजपतर्फे सुरेंद्र थोरात इच्छूक आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी अनंत कदम व ज्योती गिरमे यांची नावे पुढे येऊ शकतात. राहुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून गयाबाई ठोकळे, तर उपनगराध्यक्ष म्हणून दिनकर पवार यांनी काम पाहिले आहे. देवळाली नगर परिषदेत मंदाकिनी कदम नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष म्हणून शुभांगी पठारे कार्यरत होते.
कोपरगावचे नगराध्यक्षपद नशिबावर
कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवड जवळ येऊन ठेपली तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे़ समान संख्याबळाच्या खेळामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष निवडला जातो, की काळे-कोल्हे गटात फोडाफोडीचे राजकारण होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ कोपरगाव नगरपालिकेत कोल्हे गटाचे ११, काँग्रेस व भाजपा प्रत्येकी एक असे मिळून सत्ताधारी पक्षाचे तेरा, तर आ़ काळे यांच्या जनविकास आघाडीचे तेरा असे समसमान संख्याबळ आहे़ अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यावेळी कोल्हे गटाचे नशीब बलवत्तर होते़ दोन्ही पदे त्यांना मिळाली. येत्या आठ दिवसांत पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे़ खुल्या संवर्गातील महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे़ नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीस मिळावे, यासाठी नवरोबांच्या खेट्या काळे-कोल्हेंच्या दरबारी सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून विजया देवकर, सिंधूताई कडू, संगीता रूईकर, शोभा पवार, अलका लकारे, सुनीता जगदाळे या प्रयत्नशील असून उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर (काँग्रेस) व भारती वायखिंडे (भाजप) यांनी अडीच वर्षांपासून कोल्हे गटाला पाठिंबा दिलेला असल्याने त्याही या पदावर आपला दावा सांगत आहेतक़ाळे गटाकडून ऐश्वर्या सातभाई, वैशाली आढाव, सपना मोरे, पद्मावती बागूल व सिंधूताई शिंगाडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत़ आमचे नगरसेवक एकसंघ आहेत, असे काळे आणि कोल्हे गटाकडून सांगण्यात येत असले तरीही एकमेकांचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत़ तसे झाले तर सत्ता कुणाच्या तरी एकाच्या ताब्यात येईल, अन्यथा पुन्हा चिठ्ठ्यांच्या खेळात कोण ‘लकी लेडी’ सिद्ध होते, याकडे शहरवासियांचे लक्ष असेल.
नगराध्यक्ष निवडीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण
पाथर्डी नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या पदावर प्रियंका काळोखे की राजेंद्र उदमले विराजमान होणार हे राजीव राजळे यांच्यावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. काळोखे किंवा उदमले यापैकी कोणीही नगराध्यक्ष झाले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याच हातात पालिकेच्या चाव्या रहातील असे बोलले जात आहे.पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता असून अंतर्गत गटबाजीमुळे पालिके चे वातावरण नेहमीच तापलेले असायचे. पालिकेत एकूण सतरा नगरसेवक असून पालिका निवडणुकीत राजीव राजळे व आमदार चंद्रशेखर घुले यांनी एकत्रित प्रचार करून बारा नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आणले. उर्वरित पाच पैकी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या रामगीरबाबा आघाडीचे तीन तर प्रताप ढाकणे यांना मानणारे दोन नगरसेवक आहेत.अलीकडील काळात प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना मानणारे डॉ.दीपक देशमुख व डॉ.शारदा गर्जे या सुध्दा राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १४ झाले आहे.परंतु राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे नगराध्यक्ष नेमका कोणाच्या गटाचा होणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे.आ. घुले व ढाकणे हे दोन्ही युवा नेते एकाबाजूला तर राजीव राजळे हे दुसऱ्या बाजूला अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे त्यामुळे नगराध्यक्ष कोणाच्या गटाच्या यालाही महत्व येणार आहे.सध्याच्या संख्याबळानुसार विचार करता राजळे हे सांगतील तोच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट असले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांनी आ.पंकजा मुंडे यांची भेट घेतली असल्याचे समजते.चालू महिन्यात त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जाते. पालिकेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काळोखे व उदमले हे याच प्रवर्गाचे आहेत. येत्या १८ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजीव राजळे हे कोणाच्या नावाला हिरवा कंदील देतात यावर निवड अवलंबून आहे.अडीच वर्षासाठी हे पद असल्याने सव्वा ,सव्वा वर्ष काळोखे व उदमले यांना संधी मिळू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.काळोखे व उदमले हे दोघेही विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचेच समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पालिकेच्या चाव्या आव्हाड यांच्याच हातात रहाणार हे स्पष्ट असून त्यांचीच मोहोर पालिकेच्या राजकारणावर रहाणार हे निश्चित .