मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा, गोठ्यात लपवला; पण पोलिसांनी दणका दिलाच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 23:58 IST2025-03-07T23:57:36+5:302025-03-07T23:58:01+5:30

माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवारातील बडे वस्तीवर छापा टाकला.

Police raided an animal shelter and seized two bags of marijuana worth Rs 30 lakh on Wednesday | मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा, गोठ्यात लपवला; पण पोलिसांनी दणका दिलाच! 

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा, गोठ्यात लपवला; पण पोलिसांनी दणका दिलाच! 

अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव ते हातगाव रस्त्यावरील बडे वस्तीवर छापा टाकत जनावराच्या गोठ्यात साठविलेला ३० लाख रुपये किमतीचा दोन गोण्या गांजा बुधवारी जप्त केला. हा गांजा मध्य प्रदेशातून आणल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने अमली पदार्थावर केलेली वर्षभरातील सर्वांत मोठी कारवाई आहे.

अनिल बाबासाहेब बडे (वय ३४) व बाबासाहेब धनाजी बडे (७०, रा. हातगाव, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मध्य प्रदेशातून विक्रीसाठी गांजा आणून तो जनावरांच्या गोठ्यात ठेवला असून, या गांजाच्या छोट्या पुड्या तयार करून विक्री केल्या जात आहेत, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवारातील बडे वस्तीवर छापा टाकला.

घराची झडती घेतली असता तिथे जनावरांच्या गोठ्यात तसेच घरासमोरील दोन कारमध्ये एकूण २९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ६७ किलो गांजा मिळून आला. गांजा, दोन कार आणि मोबाइल, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक धाकराव, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे, शिवाजी ढाकणे, आदींच्या पथकाने केली. पोलिसांनी गांजाविरोधात मोहीम उघडली आहे. अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी छापेमारी सुरू आहे. मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतून गांजा विक्री केली जात असल्याने पोलिसांनी या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात माहिती असल्यास संबंधितांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले आहे.

आरोपी बडे पिता-पुत्र पोलिसाचे नातेवाईक
शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवारात गांजाचा साठा करून विक्री करणारे बडे पिता-पुत्र हे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. पोलिसांचे नातेवाईक असलेल्या बडे पिता-पुत्रांनी गांजा विक्रीत चांगलेच बस्तान बसविलेले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे बडे पिता-पुत्रांचा भांडाफोड झाला आहे. गांजावरील कारवाईची शेवगाव तालुक्यात चांगलीच चर्चा आहे.

Web Title: Police raided an animal shelter and seized two bags of marijuana worth Rs 30 lakh on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.