श्रीगोंदा : हिरडगाव येथील सरस्वती निवृत्ती दरेकर या वृद्ध महिलेचे घर पाडणारा फरार आरोपी पाहुण्यांच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी गेला. त्याचे भोजन सुरू असतानाच, तेथे पाेलिसांचा ताफा पोहोचला आणि त्याच्या बेड्या हाती पडल्या. सोमवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
हिरडगाव येथील दरेकर या महिलेचे घर तिघांनी पाडले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. हे तीनही आरोपी फरार होते. कौठा शिवारातील म्हसोबावाडी येथील पाहुण्यांकडे हे तीन आरोपी पाहुणचार घेण्यासाठी आले होते. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. आरोपींचे मोबाइल लोकेशन काढण्यात आले. म्हसोबावाडी शिवारात आरोपींचे लोकेशन निघाले. पोलीस उपनिरीक्षक रणजीत व पोलीस काॅन्स्टेबल वैराळ यांनी छापा टाकून, भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर या आरोपींना अटक केली. फरार आरोपींना सहारा दिल्याप्रकरणी पोलिसांनी म्हसोबावाडीतील त्या पाहुण्याला पोलीस स्टेशनला हजर होण्याबाबात नोटीस बजावली आहे.
वरील आरोपींना श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली.