पोलीस तपासाला बोगस सीमकार्डची दिशा
By Admin | Updated: April 28, 2023 15:38 IST2014-05-08T01:03:53+5:302023-04-28T15:38:33+5:30
अहमदनगर: भाटिया खून प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याने बोगस सीमकार्ड काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़

पोलीस तपासाला बोगस सीमकार्डची दिशा
अहमदनगर: भाटिया खून प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याने बोगस सीमकार्ड काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ सीमकार्डचा वापर कशासाठी केला, त्यावरून आरोपीने कुणाशी संवाद केला, यासह अन्य तपासासाठी आरोपी शप्पू उर्फ प्रदीप कोकाटे याला बुधवारी न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़ ए़ गायकवाड यांनी हा निकाल दिला़ गंजबाजारातील ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र भाटिया यांच्या खुनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे़ या प्रकरणात भाटिया यांची पत्नी दिव्या उर्फ हेमा व तिचा प्रियकर प्रदीप कोकाटे हे पोलीस कोठडीत आहेत़ आरोपी कोकाटे याला बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले होते़ भाटिया यांचा खुनाचा प्रकार गंभीर असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला़ या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे़ परंतु आरोपीकडे बरेच बोगस सीमकार्ड असण्याची शक्यता आहे़ते का घेतले आणि त्याचा वापर कशासाठी केला, यासह अन्य तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ भाटिया यांचा खून प्रेमसंबंधातूनच केला, अशी कबुली प्रदीप व पत्नी दिव्याने दिली़ प्रेम संबंधात जितेंद्र भाटिया अडसर ठरल्याने प्रदीपने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली़ त्यास भाटियांची पत्नी दिव्याने प्रियकराला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे़ पोलिसांनी आरोपीच्या घरून पिस्तूल, जीवंत काडतूस आणि दहा हजार रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त केला़ आधारकार्डच्या फोटोचा वापर करून आरोपीने बरेच बोगस सीमकार्ड खरेदी केले आहे़ त्यातील दोन सीमकार्डचाच फक्त वापर आरोपी करीत होते़ दोनपैकी प्रदीपचे सीमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ मात्र दिव्याकडील सीमकार्ड अजून सापडले नाही़ दिव्याच्या सीमकार्डमधून कुणाला कॉल करण्यात आले़ ते कशासाठी केले गेले, हे ते सीमकार्ड सापडल्यानंतरच उघड होईल़ प्रदीपने घेतलेले सीमकार्ड कुठे ठेवले, त्याचा वापर त्याने कशासाठी केला, याचा पोलिसांना उलगडा झाला नाही़ त्याचा तपास पोलीस घेत आहेत, यासह प्रदीपने पिस्तुलसाठी पैसे कुठून आणले़ त्याला पिस्तूल घेण्यासाठी कुणी पैसे दिले आहेत का, याचा तपास लागलेला नाही, असा युक्तिवाद करीत पोलिसांनी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला़ त्यावरन्यायालयाने पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)