पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना
By Admin | Updated: October 8, 2014 00:09 IST2014-10-07T23:38:17+5:302014-10-08T00:09:53+5:30
कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे.

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना
कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही केवळ स्नेहलता कोल्हे यांना आमदार करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले़ निळवंडे कालव्यासाठी केंद्र शासनाकडून निधी देवू व पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना कार्यान्वित केली जाईल, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली़
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाचे निरीक्षक खा़ वसंतभाई पटेल, ई़सी़ पटेल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, भरत मोरे, असलम शेख, भाजपाचे अॅड़ रवींद्र बोरावके, विजय वहाडणे, सुभाष दवंगे, महावीर दगडे, रिपाइंचे दीपक गायकवाड, रासपचे बाळासाहेब गिधाड, टेकचंद खुबानी आदी उपस्थित होते़
गडकरी म्हणाले की, गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणीप्रश्न, रस्ते, वीज, महिला बचतगट, महिला व ग्रामीण युवक रोजगार, शेती व कृषीमाल, आदिवासी, गोर-गरीब, मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार, नद्या जोड प्रकल्प, कोपरगाव शहर व मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचे मांडलेले सर्व प्रश्न हे माझ्याकडे असलेल्या आठ खात्यांशी निगडीत आहेत. तेव्हा या सर्व प्रश्नांची सोडवणूक मी करणारच आहे़ मात्र त्यासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देवून येथील उमेदवार कोल्हे यांना विजयी करावे लागणार आहे़
वर्षानुवर्षे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्याला खाईत लोटले आहे़ गरिबी ही मोठी समस्या असताना चुकीचे आर्थिक धोरण, दृष्टीहीन नेतृत्व व भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा सत्यानाश झाला आहे़ राज्यावर तीन लाख कोटीचे कर्ज आहे़ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ६० हजार कोटी रूपये खर्चाची प्रधानमंत्री सडक योजना राबविल्यामुळे देशातील एक लाख ६० हजार खेडी चांगल्या रस्त्याने जोडली गेली़ नरेंद्र मोदी यांच्या ध्येयानुसार जनधन योजनेत साडेचार कोटी खाते उघडले आहेत़ त्यांच्या डिजीटल इंडियाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असल्याचेही ते म्हणाले़
उमेदवार कोल्हे म्हणाल्या, सेवेचे व विकासाचे राजकारण करणारी मंडळी हवी आहे़ राजकारण म्हणजे सत्ताकारण बनले आहे़ निष्क्रिय आमदारांमुळे भेसूर झालेल्या कोपरगावचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे़ त्यासाठी मला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले़
(प्रतिनिधी)